चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्याच्या व्यक्तिमत्वात अनेकविध पदर आहे. येथील मातीला समृद्धीचं वरदान आहे. गिरणामाईच्या अमृतधारेनं इथल्या शेकडो पिढ्यांचं भरणपोषणं सुरुचं ठेवलंय. ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतिक अशा मोरपंखी धाग्यांनी नटलेल्या पैठणीचा साज या पंचक्रोशीचं सौदर्य अधिकचं खुलवतो….पूर्वजांची ही अभिजात देणं असली तरी, मधल्या काही वर्षात चाळीसगावच्या प्रगतीला ब्रेक लागला होता. ‘विकास’ हा तीन अक्षरी शब्दचं हद्दपार व्हावा, अशा निराशेचे मळभही येथे व्यापून होते. निष्क्रीय नेतृत्वाने फक्त बॕनरबाजीला ऊत आणून इथल्या प्रश्नांना झाकून ठेवले होते. शासकीय कार्यालयांची अवस्था तर शोचनीय होती. काही कार्यालयांना स्वतःची इमारतही नाही. याची मोठी झळ सर्वसामान्यांना बसत होती. एका कामासाठी नागरिकांना चार कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत होते. आकारानेच नव्हे तर लोकसंख्येने जिल्ह्यात मोठा असणा-या चाळीसगाव तालुक्याची ही दुरावास्था प्रस्थापित नेतृत्वाच्या उदासिन प्रवृत्तीवर शिक्कामोर्तब करणारी होती.
मात्र २०१९ मध्ये लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासारखे विकासाची दुरुदृष्टी असणारे नेतृत्व तालुक्याला लाभले व त्यांनी चाळीसगाव ला विकासापासून दूर ठेवणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध थेट झगडाचं उभा केला. मन शुद्ध असणारा हा वारकरी सुपूत्र भल्या कामाचा झेंडा घेऊन निघाला आणि गत साडेचार वर्षात चाळीसगावचा चेहरामोहराच बदलून गेला. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे आज होत असलेले लोकार्पण यासंघर्षमय कारकिर्दीचे ऐतिहासिक सुवर्णपान आहे. हा सोहळा म्हणजे तालुक्याच्या शाश्वत आणि स्मार्ट विकासाकडेचं नव्हे तर चाळीसगाव जिल्हा होण्याच्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल आहे. आपण सर्वचं यासंस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होत आहोत, याचा आनंदही मोठाचं आहे. हा अनमोल ठेवा पुढच्या असंख्य पिढ्यांना प्रेरणा देत राहील, यात तीळमात्र संदेह नाही.
आमदार मंगेशदादांनी लोकस्पर्शी विकासकामांचा धडाकाच सुरु केला आहे. चाळीसगावला महापुराच्या गर्तेत लोटणाऱ्या हॉटेल दयानंद जवळील तितूर नदीवरील जुन्या पुलाच्या जागी अवघ्या ११५ दिवसात नवा पूल उभारुन चाळीसगाव तालुक्यात सुरु असणाऱ्या विकासकामांच्या गतीची प्रचीतीच दिली. मंगेशदादांच्या प्रत्येक शब्दाला कृतीची स्पर्श असतो. हेच या कामांमधून सिद्ध होते. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच गाव – खेड्यांसह शहराच्या विकासाला चालना देणा-या योजना राबविल्या आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामीण विकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी सदोदित आमदार मंगेशदादा यांना प्रोत्साहन दिले. विकासकामांसाठी निधीचा ओघही कधी आटू दिला नाही. यामुळेच चाळीसगावचा विकास अनुशेष भरुन निघत आहे.
जनसेवेच्या व्रताचं ढोंग करता येत नाही. असे मुखवटे लगेचं गळूनही पडतात. अशा मुखवट्यांमागे लपलेले चेहरे चाळीसगावकरांनी पाहिले आणि त्यांना नाकारले देखील. आमदार मंगेशदादा यांना अशा कसोटीवर आपले नेतृत्व सिद्ध करायचे होते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रवास त्यांच्या याखडतर वाटचालीची साक्ष देतो. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केल्यानंतर ५ मार्च २०२२ रोजी त्याला मान्यता मिळाली. अर्थात मूळ प्रशासकीय मान्यतेमध्ये फक्त इमारतीला मंजूरी मिळालेली होती. २०२३ मध्ये सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी आमदार मंगेशदादांनी बरीच पायपीट केली. चाळीसगाव ते जळगाव – नाशिक – मुंबई अशा असंख्य फे-या केल्या. याप्रस्तावाचा प्रवास २५ ते ३० टेबलवरुन पुढे सरकत होता. त्रुटीं व त्यांच्या दुरुस्तींचे अग्नीदिव्य पार करावे लागत होते. याकाळात प्रत्येक कार्यालयात आमदार मंगेशदादा यांचा वरिष्ठ अधिका-यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागासह नियोजन व वित्त विभागाच्या सचीवांसमोर आमदार मंगेशदादा यांनी इमारतीच्या अंतर्गत काँक्रीट रस्ते, फर्निचर्, संरक्षक भिंत आदि सुविधा नागरिकांसाठी कशा अत्यावश्यक आहे. याचे प्रेजेंटेशनचं दिले. प्रत्यक्ष इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करतांना आमदार मंगेशदादा यांनी त्यातील गुणवत्ता, दर्जा, सोयी – सुविधा यांना विशेषकरुन प्राधान्य दिले. आमदार मंगेशदादा यांच्या पारदर्शी व सचोटीप्रिय, कमिशनविरोधी धोरणामुळेचं ही सर्व सुविधायुक्त अद्ययावत प्रशासकीय इमारत झपाट्याने उभी राहिली आहे. बांधकाम सुरु असतांना गत १६ महिन्यात आमदार मंगेशदादा यांनी २५ ते ३० वेळा भेटी देऊन पाहणी केली. आवश्यक सुचना दिल्या. धुळेरोड स्थित ३ एकर शासकीय जागेचा विस्तीर्ण परिसर या इमारतीला लाभला असून ५० हजार स्क्वेअरफूट बांधकाम आहे. या इमारतीसाठी २२ कोटी १० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये पुढील कार्यालये व अधिकारी दालने समाविष्ठ असतील !
तहसीलदार यांच्या अंतर्गत नायब तहसीलदार, पुरवठा शाखा, महसूल शाखा, संजय गांधी योजना, रोहयो शाखा, निवडणूक शाखा, संगणकीकरण कक्ष यासाठी स्वतंत्र व सुसज्ज दालने असणार आहेत. यासोबतच तालुका भूमी अभिलेख कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, उपकोषागार कार्यालय, दुय्यम निबंधक १ व २ यांची कार्यालये,तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मुद्रांक कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालय – आदी विविध शासकीय कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत.
इमारतीच्या आवारात ध्वजारोहणासह अद्ययावत फर्नीचर, लैंडस्केप, अंतर्गत काँक्रीट रस्ते, पार्किंग व्यवस्था, इलेक्ट्रिक फिटींग, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालये, अभ्यागत कक्ष, …अशा बहुविध सुविधा प्रशासकीय इमारतीत एकवटल्या आहे. बांधकामासाठी व सुशोभीकरणासाठी वापरलेले साहित्य हे नामांकित कंपन्यांचे आहे. या इमारतीमुळे सर्व शासकीय कार्यालये त्यांच्या अस्थापना एकाच छताखाली आल्या आहेत. याचा थेट फायदा चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांना होणार आहे. शासकीय कामांसाठी त्यांचे हेलपाटे कमी होऊन पायपीटही थांबणार आहे.
नाशिकस्थित संजीवनी इन्फ्रा कंपनीच्या अतुल सुधाकर अडावदकर व त्यांच्या भागीदाराने इमारतीला हे लोभस रुपडे दिले आहे. आमदार मंगेशदादा यांचे मार्गदर्शन आणि इमारतीच्या बांधकामासाठी मोठ्या संख्येने उपलब्ध झालेले मनुष्यबळ यामुळे मुदतीआधी आठ महिने इमारत बांधून पूर्ण झाली. याइमारतीमुळे चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात नवा मोरपीस खोवला गेला आहे. पुढच्या काळात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चाळीसगावची नवी ओळख अधोरेखित करणार आहे.
आमदार मंगेशदादा यांच्या साडेचार वर्षात आजवर १५०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. चाळीसगाव तालुक्याच्या मागील १०० वर्षाच्या इतिहासात प्रथमचं राज्य शासनाच्या तिरोजीरीतून चाळीसगावसाठी निधीचा असा ओघ वाहिला आहे. चाळीसगाव नव्याने बदलत आहे, घडतही आहे. स्वतंत्र आरटीओ कार्यालयाने चाळीसगावला राज्यभर एमएच ५२ अशी नवी ओळख मिळाली आहे. वरखेडे – लोंढे धरणाच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरु झाले असून धरणाचे लोकार्पण उंबरठ्यावर आहे. चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळविण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले असून यामुळे सर्वसामान्यांना उपचारासाठी आता धुळे जळगाव जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर शहरातील घाट रोड, स्टेशन रोड आदी रस्ते कॉक्रीटीकरण होत असल्याने नेहमीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. केवळ प्रमुख रस्तेच नाही तर गल्लीबोळातील रस्ते सुद्धा चकाचक होत आहे. शहरात नाट्यगृह उभारणीचे काम प्रगतीपथावर असून तिसरी घंटाही लवकरच वाजणार आहे. शहरातील सुवर्णाताई गार्डनसह ३० हून अधिक ओपन स्पेस सुशोभिकरण कामामुळे अबालवृद्धांना विरंगुळासाठी हक्काच्या जागा उपलब्ध होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॉलेज पॉइंट जवळील महाराणा प्रताप चौक आदी ठिकाणी चौकांचे सुशोभिकरण प्रस्तावित असल्याने नेहमी वर्दळीचे असलेले हे चौक आता मोकळा श्वास घेतील. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाचे नूतनीकरण देखील मंजूर झाल्याने जलतरणाची आवड असणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते, संत सेवालाल व वीर एकलव्य भवन, सभागृहे, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये, पाणीपुरवठा योजना आदी कामांच्या माध्यमातून विकासाचा झंझावात सुरु आहे. कायम दुष्काळग्रस्त रोहिणी व १७ गावांना थेट गिरणा धरणावरून पाणीपुरवठा योजना काम अंतिम टप्प्यात आहे. विकासाबरोबरच अध्यात्म व ऐतिहासिक वारसा जोपासायचा आमदार मंगेशदादा यांचा संकल्प आहे. शिवछत्रपतींचा मावळा म्हणून आमदार मंगेशदादा यांनी तरुणाईसाठी रायगडवारीचा उपक्रम सुरु केला असून अंगणवाडी ताईंसह हजारो कष्टकरी महिलांचे माहेरपण साजरे केलेयं.
शिष्यवृत्तीच्या रुपाने गुणवत्ता विद्यार्थ्यांना लढण्याचे बळ दिले आहे. ज्येष्ठ नागरिकांना पंढरपुरला नेणारे आमदार मंगेशदादा त्यांच्यासाठी पुंडलिक झाले आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण पर्वणीवर समस्त चाळीसगाववासियांतर्फे आमदार मंगेशदादा यांचे शतशः जाहीर अभिनंदन केले जात आहे. लाभले भाग्य आम्हास…आमचे आमदार मंगेशदादा चव्हाण अशीच समस्त चाळीसगावकरांची भावना आहे. म्हणूनचं चाळीसगावकरांच्या मनामनातून त्यांच्या दैदिप्यमान विजयाचा संकल्पही केला जात असल्याचे चित्र आहे.