चाळीसगांव (प्रतिनिधी) शहरातील यशोदीप कॉम्पुटर सेंटरचे संचालक स्वप्नील भाऊसाहेब राखुंडे (वय ४०, रा. स्टेशन रोड, चाळीसगांव) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत गंभीर आरोप केला आहे की, एका गुन्ह्यात सहभागी नसतानाही त्यांना आरोपी करण्याची भीती दाखवून एका पोलीस कर्मचार्याने त्यांच्याकडून तब्बल १ लाख २० हजार रुपयांची खंडणी उकळली. विशेष म्हणजे आमदार मंगेश चव्हाण हे स्वतः या प्रकरणी पोलीस ठाण्यात चार तास ठाण मांडून होते आणि त्यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. एवढेच नव्हे तर माझ्या तालुक्यात मी असे प्रकार मुळीच खपवून घेणार नाही असा इशारा देखील दिला.
स्वप्नील राखुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, १८ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या कॉम्पुटर क्लासमध्ये दोन पोलीस आले व त्यांनी विचारणा केली की, निखील राठोड तुमच्याकडे काम करतो का? त्यांनी होकार दिल्यावर पोलिसांनी सांगितले की, निखीलवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे आणि तो तुमच्या क्लासमध्ये पीडितेला घेऊन येत होता. त्यामुळे ही जागा वापरली गेल्याने तुम्ही, तुमचा भाऊ आणि तुमच्या आईच्या नावावर असलेली जागाही तपासाच्या कक्षेत येऊ शकते, असे सांगत आरोपी करण्याची धमकी दिली. त्यानंतर एका पोलिसाने बाजूला बोलवून “मधला मार्ग काढू, पण त्यासाठी पैसे द्यावे लागतील,” असे सांगितले. राखुंडे यांनी लगेच मित्र योगेश साळुंखे यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले आणि रात्री ८ वाजता पोलीसांनी कोर्टाजवळ बोलावून रक्कम स्वीकारली. मात्र त्यावर समाधान न दाखवत अजून ७० हजार रुपये मागितले. राखुंडे यांनी पुन्हा एकदा साळुंखे यांच्याकडून ५० हजार आणि स्वतःकडील २० हजार रुपये मिळवून १९ मे रोजी राष्ट्रीय विद्यालयाजवळ दुसऱ्यांदा पोलीसांना रक्कम दिली.
यानंतर पोलिसांनी त्यांना चाळीसगाव पोलीस स्टेशनला बोलावून एक नोटीसवर सही घेतली आणि चौकशीसाठी बोलावले. मात्र, दुसऱ्या दिवशी मित्रांनी त्यांना जागृत करत पोलीसांनी फसवणूक व धमकी दिली असल्याचे समजवले. यावरून राखुंडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या चौकशीत ८०९७०१७१४३ या मोबाईल नंबरचा तपास घेतल्यावर तो अजय पाटील नावाच्या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यानेच पैसे घेतल्याचे राखुंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात चार तास ठाण मांडून होते. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले सर्वसामान्य नागरिकांना जर त्रास दिला जात असेल तर तो मी माझ्या तालुक्यात मुळीच खपवून घेणार नाही, असे खडे बोल त्यांनी पोलिसांना सुनावले. या प्रकरणी अधिक तपास सुरु असून, खाकी वर्दीतून खंडणी उकळली गेल्याचे समोर आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.