भुसावळ (प्रतिनिधी) कोरोना काळात सुरु झालेले किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून वाढीव व्ही.पी.यु.रॅक उपलब्ध करून देण्याची मागणी होती, शेतकऱ्यांची ही मागणी मंजूर झाली असून भुसावळ स्थानकावर वाढीव व्ही.पी.यु.रॅक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच सावदा व रावेर स्थानकांवर १६ ते २० व्ही.पी.यु.रॅक शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या विविध नवीन कामांच्या व जुन्या प्रलंबित कामांच्याबाबत आज विभागीय रेल्वे कार्यालय भुसावळ येथे खासदार रक्षाताई खडसे यांनी आढावा बैठक घेतली.
यामध्ये रेल्वेच्या पूर्वीच्या प्रलंबित असलेल्या कामांना गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले असून नवीन प्रस्तावित कामांसाठी अधिकाऱ्यांना तयार राहण्याबाबत खासदारांकडून सूचित करण्यात आले. यासोबतच आर.ओ.बी. (रोड ओव्हर ब्रिज) मंजूर झालेले आहेत. त्यांची कुठवर प्रगती झाली आहे याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. तसेच जामनेर-जळगाव या नॅरो-वे पीजी रेल्वेचा ब्रॉड-वे रेल्वेमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव सादर झालेला असून पाठपुरावा घेणे सुरु आहे. याबाबतही सकारात्मक निर्णय होणार असून रेल्वे प्रशासनाने याबाबत सजग राहावे. मागील पाच ते सहावर्षापासून रेल्वेची बरीच कामे ही प्रलंबित आहेत. निधी मंजूर होऊनही कामे काही अंतिम टप्प्यात आलेली नाहीत. त्यामुळे सुस्तावलेल्या रेल्वे प्रशासनाला खासदारांकडून खडबडून जागे करण्यात आलेले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना कोरोनासह नैसर्गिक आपत्त्यांचा सामना करावा लागत आहे. यात वाढीव व्ही.पी.यु.रॅक उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच भुसावळ येथे मोनो रेल्वेचे केंद्र मंजूर झालेले असून याबाबतचा टेंडर प्रस्तावित आहे. यामुळे भुसावळ मधील नागरिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. यासोबतच जामनेर-पाचोरा-बोदवड स्थानकांचा सर्व्हे पूर्ण झाला असून जवळपास ८०० कोटींचा प्रोजेक्ट अहवाल अंतिम मंजुरीसाठी मुंबईला पाठविण्यात आला आहे. यात अरुंद पुलांचे नूतनीकरून होऊन मोठ्या पुलांमध्ये रूपांतर करण्यात येणार असून जामनेर ते बोदवड अशी रेल्वे लाईन जोडण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर झालेला असून अंतिम मंजुरीसाठी पाठविला गेला आहे. यासोबतच १२० कोटी रुपयांच्या कोच(COACH) फॅक्टरी प्रोजेक्टवरही टेंडर प्रक्रिया सुरु असून यासंदर्भातही अंतिम मंजुरी लवकरच मिळून कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
यासोबतच नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, वरणगाव, सावदा आणि रावेर इत्यादी स्थानकांवर पायाभूत सुविधा आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन स्थानकांची पाहणी करून लवकरात लवकर संबंधित स्थानकांच्या बाबतच अहवाल सादर करावा असे आदेश खासदारांकडून देण्यात आले आहेत. भुसावळ स्थानकांवर बऱ्याच प्रवाशांच्या सामानाच्या चोरीबाबत तक्रारी वाढत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या सामानाचीही सुरक्षितता राखण्याबाबत योग्य त्या उपाय योजनांचे अवलंबन करण्यात यावे याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यासोबतच रेल्वेच्या सात हजार कर्मचाऱ्यांपैकी तीन हजार कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण झालेले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकर होण्यासाठी वाढीव चाचण्या व लसीकरणाचे प्रमाण कसे वाढविता येईल याबाबत नियोजन करणेबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी सूचना केल्या.
रेल्वेच्या नवीन प्रस्तावित व प्रलंबित कामांच्या आढावा बैठकीला आ. संजय सावकारे, रेल्वे विभागीय व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता, सिनियर डी.ई.एन. राजेश चिखले, डेप्युटी सी.ई.ई. कन्स्ट्रक्शन पंकज धावरे, सिनियर डी.सी.एम. युवराज पाटील, सिनियर डी.ओ.एम.आर.के. शर्मा, सिनियर डी.एन. नॉर्थ योगेश गारद आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.