चिपळूण (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकताच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या साथीने पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. यावेळी नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. मात्र त्यात मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण दरेकरांनाही राणेंनी गप्प केलं. “थांब रे मध्ये बोलू नको” असं म्हणत दरेकरांना बोलूच दिलं नाही.
२२ जुलैपासून कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या. त्यानंतर ३ दिवसापुर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण दौरा केला होता.
नारायण राणे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करण्यासाठी आले होते. चिपळूणमधील पाहणीच्या वेळी एकही सरकारी अधिकारी सोबत नसल्यानं राणे चांगलेच भडकले होते. सुरुवातीला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून झापलं, ‘मी इथं बाजारपेठेत उभा आहे. तुमचा एकही माणूस आमच्यासोबत नाही,’ असं राणे म्हणाले. त्यानंतर तिथे आलेल्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच सुनावलं. ‘पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात, असे प्रश्न विचारत राणे अधिकाऱ्यांना होते.
राणे अधिकाऱ्यांना झापंत होते त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. यानंतर राणेंनी ‘थांब रे मध्ये बोलू नको…’ असं म्हणत दरेकरांना गप्प केलं. राणेंनी आपल्याच पक्षातील मोठ्या नेत्याला सर्वांसमोर गप्प केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.