नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनामुळे देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
देशात सध्या कोरोनाने कहर केला असून याचा फटका महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसला आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले असून दिल्लीसोबत इतर अनेक राज्यांनीही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. यासाठी अनेक राज्यांनी केंद्राकडे मदतही मागितली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तसंच दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “देशात अभुतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचं किमान दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं. जय हिंद!”
अमित शाह लॉकडाऊनबाबत नेमकं काय म्हणाले?
देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकार घाईघाईने घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. तुर्तास घाईघाईने लॉकडाऊन करावे, अशी परिस्थिती नाही. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे, पण या विषाणूवर आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.