नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना लसीचे प्रतिकूल परिणाम बर्याच लोकांमध्ये दिसून आले आहेत. याच दरम्यान कोरोनाची लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लस घेतल्यानंतर दुसऱ्याचा दिवशी मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी लसीमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका ४५ वर्षीय वॉर्ड बॉयचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे.
लस घेतल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लस घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना त्रास जाणवू लागला. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता तिथेच त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिपाल सिंह असं मृत्यू झालेल्या वॉर्ड बॉयचं नाव आहे. त्यांनी लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लस घेतली होती. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी महिपाल यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. मात्र कुटुंबियांनी कोरोना लस घेतल्यामुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीत ५२ आरोग्य कर्मचार्यांना कोरोनावरील लस दिल्यानंतर त्रास झाला होता. त्यापैकी काहींनी अॅलर्जीची तक्रार केली तर काही जणांची भीती व्यक्त केली. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “महिपाल यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचे शवविच्छेदन केले जणार आहे.”
















