मुंबई (वृत्तसंस्था) भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी तत्कालिन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याचं वृत्त आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना झोटिंग समिती हा निव्वळ फार्स होता का?, खडसेंना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं होतं का? असा सवाल देखील नाना पटोलेंनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
खडसेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग कमिटीचा अहवाल गायब आहे. त्यावरुन पटोलेंनी हल्लाबोल केला. पंकजा मुंडे यांना डावलल्याचा आरोपही नाना पटोले यांनी यावेळी केलाय. भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा बहुजन विरोधी पक्ष आहे, असा हल्लाबोल पटोलेंनी केलाय. नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना झोटींग समिती हा एक फार्स होता का? असा सवाल उपस्थि केला आहे. खडसे सारख्या बहुजन समाजाच्या माणसाला बदनाम करण्याचा डाव होता का? हे सगळे प्रश्न त्या माध्यमातून पुढे येत आहेत. जर एखाद्या समितीचा अहवालच जर गायब होत असेल तर खडसेंच्या विरोधात षडयंत्र रचलं होतं असं बोललं तर वावगं ठरणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये एकमत
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्याची रणनीती आखली. मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण कसे देता येईल याची चर्चा झाली. महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. माझं वाक्य तोडून मोडून दाखवलं. मी काही चुकीचं बोललो नाही. पक्षप्रमुख म्हणून बोलणं हे काम आहे. कार्यकर्त्याचं गाऱ्हाणं ऐकणं माझं काम आहे, असं नाना पटोलेंनी सांगितलं.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी देखील तेच सांगितलं. पण मला विरोध का होतोय माहिती नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलंय. महागाई विरोधात देशभरात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. संघटनात्मक दृष्टीकोनातून बैठका सुरु आहेत. कोणीतरी मीडियाच्या माध्यमातून बातम्या पेरतात, केंद्र लस पुरवत नाही. चीन बॉर्डवर येऊन बसला आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला.
फडणवीस हे खोटे बोलणारे मुख्यमंत्री
नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “काल मी त्यावेळेचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेतील भाषण ऐकत होतो. नारायण राणे विधानपरिषदेचे काँग्रेसचे सदस्य होते. त्यावेळी त्यांनी नागपूरच्या मुन्ना यादव संदर्भात भाष्य केलं होतं. फडणवीस सरकार चोरांना कशी साथ यावर भाषण होते. त्यावर उत्तर देताना फडणवीस खोटे बोलले. मुन्ना यादववर राजकीय गुन्हे आहेत, कोणत्याही हत्येचे, बलात्काराचे गुन्हे आहेत, खंडणी गोळा करण्याचे गुन्हे नाहीत, असं फडणवीस यांनी सांगितलं. सर्वांना माहिती आहेत मुन्ना यादववर कोणते गुन्हे दाखल आहेत. या पद्धतीचं खोटं बोलणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.