मुंबई (वृत्तसंस्था) प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसंच दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही असं स्पष्ट मत मोहन भागवत यांनी यांनी मांडलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवतांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचं त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.
“मी मोहन भागवत यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं आहे. मोहन भागवत बरोबर बोलले,” असं संजय राऊतांनी सांगितलं. मोहन भागवत यांनी “कशाला वाद निर्माण करायचा? प्रत्येक मशिदीत शिवलिंगचा शोध कशासाठी घ्यायचा?,” अशी विचारणा नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना केली आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, “या देशात अनेक राज्यात आणि खासकरुन जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तेथील नागरिक अत्यंत धोक्याखाली आहेत. घऱात, कार्यालयात घुसून त्यांना रोज मारलं जात आहे. कलम ३७० हटवल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही”.
“कश्मीर फाईल्स चित्रपटाचं प्रमोशन करण्यात आलं. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्याने ४००, ५०० कोटी कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आहे. खरं तर आज जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावं,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
“काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे. राज्यपालांसोबत गृहमंत्र्यांनी काल एक तातडीची बैठक बोलावली होती. सरकार प्रयत्न करत आहे, पण आज १९९० मध्ये होती तशीच स्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घऱवापसीबद्दल सांगितलं होतं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली.