साप्ताहिक राशिभविष्य, १० ते १६ एप्रिल २०२२ : एप्रिलच्या या आठवड्यात ग्रह नक्षत्राच्या स्थितीत अनेक महत्वपूर्ण बदल होतील. राहू केतू सोबत बृहस्पती आणि ग्रहांचा राजा सूर्य या आठवड्यात मार्गक्रमण करणार आहेत. या ग्रहांच्या मार्गक्रमणाचा प्रभाव सर्व राशीवर पडेल.
मेष :
अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात अतिशय फॉर्मात येतील. खेळाडू व कलाकारांचं मोठं भाग्य उजळेल. ता. १२ व १३ हे दिवस विशिष्ट विक्रम प्रस्थापित करतील. भरणी नक्षत्रास वरील दिवस व्यावसायिक आर्थिक लाभ करून देतील. तरुणांना परिचयोत्तर विवाहयोग!
वृषभ :
रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींस सप्ताहातील शुक्रभ्रमण कडक उन्हाळ्यातही थंडगार झुळका देईल. व्यावसायिक शुभारंभ. पती वा पत्नीचा नोकरीत भाग्योदय. कृत्तिका नक्षत्रास ता. १३ व १४ हे दिवस संकटविमोचनाचे. मंत्रालयातून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ मोठ्या सुवार्तांतून मौजमजा! मात्र, उष्णताजन्य विकार सांभाळा.
मिथुन :
भाग्यातील शुक्रभ्रमण आणि गुरूचं राश्यंतर मोठं अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. ता. १३ व १४ हे दिवस सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवतील. आर्द्रा व्यक्ती अतिशय फॉर्ममध्ये येतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ चा गुरुवार विलक्षण राहील. मोठी चिंता जाईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.
कर्क :
गुरूचं राशीच्या भाग्यातील आगमन मोठं शुभसूचकच राहील. ता. १३ व १४ हे दिवस मोठा फास्टट्रॅक ठेवतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी कामं मार्गी लागतील. व्यावसायिक वास्तुखरेदी. जुन्या गुंतवणुकींतून लाभ. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र घरात सुवार्तांचं कार्य ठरवेल.
सिंह :
सप्ताहात शुक्रभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर जोरदार मुसंडी मारणार आहात. ता. १३ व १४ हे दिवस तरुणांमध्ये चांगलीच जान आणतील. नोकरीच्या अफलातून संधी येतील. मघा नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांतून चर्चेत राहतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात व्यावसायिक मोठी तेजी अनुभवतील. घरातील तरुणांचे भाग्योदय होतील. उष्णताजन्य विकारांपासून काळजी घ्या.
कन्या :
सप्ताहातील शुभ ग्रहांचे योग चंद्रबळातून उत्तम बोलतील. ओळखी-मध्यस्थी फलद्रूप होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. मात्र, जुगार टाळा. प्रवासात प्रकृती जपा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात उष्णताजन्य विकारांतून त्रास. पौर्णिमेजवळ धारदार वस्तू जपा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १४ चा गुरुवार भाग्याचा.
तूळ :
सप्ताहाची सुरुवात नोकरी-व्यावसायिक उत्तम घडामोडींची. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह त्वचाविकारातून त्रासाचा. उष्माघातापासून सावध. बाकी स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ व १४ हे दिवस प्रसिद्धियोगाचे. प्रेम प्रकरणात प्रगती. नोकरीत बदलीतून लाभ.
वृश्चिक :
पौर्णिमेकडे झेपावणाऱ्या चंद्रबळातून अफलातून लाभ होतील. उत्तम पेहेराव करून मार्केटिंगसाठी तयार राहा. ता. १३ ते १६ हे दिवस चढत्या क्रमाने जल्लोष करतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती व्यावसायिक प्राप्तीचं रेकॉर्ड करतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मोठा वाव मिळून मानांकन मिळेल. शुक्रवार मोठ्या भाग्याचा.
धनू :
पौर्णिमेच्या सप्ताहात शुभ ग्रहांची मंत्रालयं प्रचंड क्रियाशील होऊन आपणास पाठबळ देतील. कनेक्टिव्हिटीसाठी अँटिने सज्ज ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती चंद्रबळाचा अतिशय लाभ उठवतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती ता. १३ व १४ या दिवसांत मोठे चौकार-षटकार ठोकतील आणि विजयी होतील. पौर्णिमेजवळ आदरसत्कार.
मकर :
ग्रहांचं फिल्ड व्यावसायिक आर्थिक ओघ पूर्ववत करेल. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र शुक्रभ्रमणाची ताकद वाढवेल. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनं यशस्वी होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ व १४ हे दिवस मुलाखतींतून यश देणारे. एखादी व्यावसायिक वसुली होईल. सरकारदरबारी यश मिळेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा विवाहयोगाची.
कुंभ :
राशीतील शुक्रभ्रमण ग्रहांचं फिल्ड ताब्यात घेईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती परिस्थितीचा लाभ उठवतील. मात्र, ऐन उन्हाळ्यातील राशीचं मंगळभ्रमण जुनाट व्याधींच्या पार्श्वभूमीवर दखलपात्र. कुपथ्यं टाळा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास पौर्णिमेजवळ मोठे धनलाभ. कलाकारांचे मोठे भाग्योदय. विवाहस्थळांचा पाठपुरावा करा.
मीन :
सप्ताहात राशीत गुरूचं आगमन होत आहे. पौर्णिमेकडे झुकणारा हा सप्ताह गुरूच्या स्वागतासाठी सज्जच राहील. स्वतंत्र व्यावसायिकांना हा सप्ताह उत्तमच. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींस सप्ताहाचा शेवट आत्मविश्वास वाढवेल. ता. १५ चा शुक्रवार उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील तरुणांच्या भाग्योदयाचा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत सुवार्ता.