मेष : व्यवसायात सध्या पूर्वीपेक्षा बराच बदल झालेला दिसून येईल. उलाढालीचे स्वरूप मोठे असेल. तांत्रिक अडथळे कमी होतील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा चणचण भासणार नाही. चांगला मोबदला मिळेल. सप्ताहातील सर्व दिवसांचा कालावधी चांगला जाईल. कोणत्याही गोष्टीसाठी पळापळ करावी लागणार नाही. प्रत्येक गोष्ट वेळेत होईल. त्यामुळे कामातील उत्साह टिकून राहील. पौर्णिमा पराक्रम स्थानातून होत आहे. या कालावधीत धाडस वाढेल.
वृषभ : पौर्णिमा धनस्थानातून होत आहे निश्चितच पौर्णिमा कालावधीत धनलाभ होईल. व्यावसायिकांना सध्याचे दिवस लाभदायक ठरतील. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर चर्चेत सहभाग घेऊ नका, शांत राहा. दिनांक १ आणि २ रोजी समोरून आलेल्या परिस्थितीचा अंदाज घ्या. एक घाव दोन तुकडे करणे त्रासाचे ठरेल. ऐकीव बातमीवर विश्वास ठेवू नका. आपले म्हणणे जरी खरे असले तरी ही वेळ आपल्यासाठी चांगली नाही असे समजा. शांतपणाने आपले मत मांडा. तरच गोष्टी निवळतील. बाकी दिवस चांगले असतील.
मिथुन : व्यवसायात अनावश्यक मालाची खरेदी-विक्री टाळा. हिशोब चोख ठेवा. नोकरदार वर्गाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. आर्थिकदृष्टय़ा गुंतवणूक टाळा. राजकीय क्षेत्रात पुढाकार घेताना कामाचा अंदाज घ्या. दिनांक ३, ४ रोजी धाडसी निर्णय घेऊन चालणार नाही. इतरांचा सल्ला घेताना तो कितपत योग्य आहे याची शहानिशा करा. त्याशिवाय इतरांच्या सल्ल्याने कोणतीही गोष्ट करणे टाळा. भावनिक गोष्टींच्या आहारी जाऊ नका.
कर्क : व्यवसायात हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. खर्च कमी करा. दिनांक ५, ६, ७ असे हे तीन दिवस चढउताराचे राहतील. या तीन दिवसांत दुहेरी भूमिका करणे टाळा. ‘आपले काम आणि आपण भले’ हेच सूत्र अंगी बाणा. एखाद्या व्यक्तीचा राग आला तरी तो तुमच्या आचरणातून समोरच्या व्यक्तीला दाखवून देऊ नका. विचार करून बोलणे महत्त्वाचे राहील.
सिंह : थांबलेल्या गोष्टींना गती येईल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. मागील पोकळी भरून काढाल. उधारी वसूल होईल. व्यावसायिक प्रगती होईल. नोकरदार वर्गाचे नियोजन सूत्रबद्ध राहील. आर्थिकदृष्टय़ा सफलता मिळेल. राजकीय क्षेत्रात उत्साह वाटेल. मित्र परिवारासोबत पर्यटन स्थळाला भेट द्याल. पौर्णिमा कालावधीत ज्येष्ठांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल व ते लाभाचेही ठरेल. सध्या सर्व दिवस चांगले असल्यामुळे शुभकार्याची सुरुवात होईल.
कन्या : कोणालाही वैयक्तिक स्तरावर सल्ला देऊ नका. बाकी दिवसांचा कालावधीत चांगला असेल. अनपेक्षित लाभ होईल नोकरदार वर्गाला महत्त्वाची जबाबदारी घ्यावी लागेल. सध्या पैशांच्या बाबतीत तडजोड करावी लागणार नाही. दिनांक १ व २ रोजी स्वत:हून एखाद्या गोष्टीचा पुढाकार घेऊन जबाबदारी वाढवून घेऊ नका. त्यामुळे या दोन दिवसात पळापळ होऊ शकते. यामुळे मानसिक चिडचिड वाढेल. कितीही नियोजन केले तरी ते बिघडू शकते. त्यापेक्षा हे दोन दिवस आराम करा.
तूळ : धाडसी निर्णय टाळा. व्यवसायात अनेक क्षेत्रांत सरस राहाल. व्यावसायिकदृष्टय़ा तोंडी व्यवहारापेक्षा लेखी करारात्मक व्यवहाराला महत्त्व द्या. नोकरदार वर्गाच्या कामाचा दर्जा सुधारलेला असेल. आर्थिक बाबतीत खबरदारी घ्या.दिनांक ३, ४ रोजी कोणतीही देवाणघेवाण करताना काळजी घ्या. नाते हे भावनांवर चालते, जग हे व्यवहारावर चालते हे मात्र विसरू नका. भावनिक गोष्टींना बळी पडू नका.
वृश्चिक : नियमांच्या चौकटीत राहून काम करा. बेकायदेशीर गोष्टींच्या नादी लागू नका. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालणे टाळा. दुसऱ्यांनी बदल करावा ही अपेक्षा ठेवूच नका. व्यवसायात आजचे काम उद्या, उद्याचे परवा अशी कामाची सवय टाळा. व्यावसायिक मोबदला चांगला मिळावा म्हणून नको ती मध्यस्थी करू नका. नोकरदार वर्गाच्या कामाच्या जबाबदारीत वाढ होईल. आर्थिकदृष्टय़ा व्यवहार जपून करा.
धनू : सध्या व्यवसायात चांगला जम बसू लागेल. फायद्याचे प्रमाण वाढते राहील. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी जमेल तेवढीच करा. आर्थिकदृष्टय़ा अनावश्यक खर्च टाळा. समाजसेवेपासून दूर राहा. मुलांच्या बाबतीत काही कारणांवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. दिनांक ३, ४ असे हे संपूर्ण दिवस स्वत:हून कोणताही अडथळा निर्माण करू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तडकाफडकी बोलल्यामुळे अडचणी वाढू शकतात. अशा वेळी शांत राहणे सर्वात उत्तम पर्याय असेल. या कालावधीत महत्त्वाच्या गोष्टी पुढे ढकला.
मकर : व्यवसायात कोणतीही गुंतवणूक करताना संभ्रमावस्था निर्माण होईल. गुंतवणुकीवर अंदाज अचूक बांधा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या आदेशानुसार कामकाजात बदल करावे लागतील. आर्थिकदृष्टय़ा नियोजन करा. राजकीय क्षेत्रात चर्चेत सहभागी होताना संयम ठेवा. मित्रपरिवाराशी क्षुल्लक कारणावरून वाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. दिनांक ५, ६, ७ असे तीन दिवस वेळेनुसार कामकाज करा. घाई करून कोणतेही निर्णय घेऊ नका. कारण नसताना गैरसमज वाढू शकतात. कोणत्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष लगेच लावायला जाऊ नका.
कुंभ : सध्या ठरवून ठेवलेल्या गोष्टींना यश मिळेल. ज्या गोष्टींसाठी फार कष्ट करावे लागत होते ते कष्ट कमी होतील. त्यामुळे कोणत्याही कामाचा पुढाकार घ्यायला कमीपणा वाटणार नाही. कामातील अडथळे कमी होतील. ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न कराल. दलाली व्यावसायिकांना फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने काम करावे लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सडेतोड भूमिका करून चालणार नाही.
मीन : कामातील उत्साह वाढेल. कारण अपेक्षित अशा गोष्टी घडू लागतील. प्रतिष्ठा पणाला लावून काम करण्याची वेळ येणार नाही. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यावसायिक मोबदला चांगला मिळेल. व्यावसायिक कर्ज कमी होईल. नोकरदार वर्गाने केलेल्या कामाचे कौतुक होईल. आर्थिकदृष्टय़ा आवक वाढेल. राजकीय क्षेत्रातील मार्ग मोकळे होतील. नातेवाईकांच्या कोणत्याही वैयक्तिक गोष्टीत पडू नका. भावंडांशी वैर टाळा. शेजाऱ्यांशी जेवढय़ास तेवढे राहा.आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.