मेष : व्यवसायातील पाऊल प्रगतिपथावर नेईल. नोकरदार वर्गाचा भाग्योदय होईल. अधिकार मिळेल. खर्च कमी करा. दिनांक १ व २ या दोन दिवशी मात्र धावपळ करून काहीही साध्य होणार नाही हे लक्षात ठेवा. या दिवशी धावपळ होऊ नये यासाठी आधी नियोजन करावे लागेल. इतरांवर अवलंबून राहू नका, त्यामुळे तुमची चिडचिड वाढेल. स्वत:हून स्वत:च्या कामात लक्ष घातल्यास अडचण येणार नाही. आपले काम व्हावे असे वाटत असेल तर गोड बोलूनच करून घ्यावे लागेल. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल.
वृषभ : व्यवसायात मोठी उलाढाल वाढेल. फायदा मोठय़ा प्रमाणात होईल. नोकरदार वर्गाला काम करताना वरिष्ठांवर अवलंबून राहून चालणार नाही. आर्थिक नियोजन मार्गी लागेल. राजकीय क्षेत्रात इतरांचे मत घेऊनच निर्णय घ्यावे लागतील. दिनांक २७ रोजीचा एकच दिवस अनुकूल नाही. बऱ्याच दिवसांपासून जे ध्येय साध्य होत नव्हते ते साध्य होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी होणारी धावपळ उत्साह वाढवणारी असेल.नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. भावंडांशी नाते दृढ होईल.
मिथुन : व्यावसायिक वाढ व्हावी म्हणून ज्या जाहिरात माध्यमांचा वापर करणार आहात, ती फायद्याची असेल. नोकरदार वर्गाच्या कामातील गती वाढेल. आर्थिक नियोजन करा. भावंडांशी संवाद जपून करा. वादविवादामुळे काही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. दिनांक २८, २९ या दोन दिवसांत आपण कितीही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी तसे होणार नाही. समोरून अशा काही गोष्टी येतील की आपला रागाचा पारा चढणारा असेल. तरीही संयम सोडू नका. कारण हे दोन दिवस आपल्याला फारसे चांगले नाहीत हे लक्षात ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.
कर्क : या आठवड्यात बोलताना वरच्या स्वरात न बोलता शांतपणे मत मांडा, त्यामुळे बिघडणाऱ्या गोष्टी सावरतील. अन्यथा गोष्टी बिघडल्याशिवाय राहणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या वेळी असे भ्रमण असते त्या वेळी धरून चाला की सप्ताहातील सर्वच दिवस अडचण निर्माण करणारे असतात. नारळी पौर्णिमा अष्टमस्थानातून होत आहे. या दिवशी जपूनच पाऊल टाका. व्यवसायात जे चालले आहे ते चांगलेच आहे असे समजा. नोकरदार वर्गाने स्वत:हून कामकाजात कोणताही बदल करू नका. खर्च करताना विचार करा. समाजमाध्यमांचा वापर करताना भान ठेवा. कुटुंबाशी दुरावा येणार नाही याची काळजी घ्या.
सिंह : आपलेच खरे करण्यात दिवस वाया घालवू नका. हे सर्व दिवस जपून पाऊल टाकावे लागणार आहे. इतरांवर अवलंबून राहिल्यास कामाचा खोळंबा होणार आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवावा लागेल. नारळी पौर्णिमेदिवशी वादविवाद टाळा. व्यवसायासाठी कष्ट करावे लागतील. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागेल. आर्थिक व्यवहार करताना हुशारीने वागा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करणे टाळा. चंद्र ग्रहाचे भ्रमण सप्ताह अनुकूल आहे असे म्हणता येणार नाही. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी मागचापुढचा विचार करूनच करावी लागेल.
कन्या : व्यवसायात धरसोड वृत्ती टाळा. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहिलेले चांगले. आर्थिक व्यवहार जपून करा. राजकीय क्षेत्रात काम करण्याची मानसिकता निर्माण होईल. मुलांसोबत करमणूक घडेल. मैत्रीच्या नात्यात सलोखा वाढेल. दिनांक ३०, ३१ हे दोन दिवस शांत राहून सुवर्णमध्य साधा. या दोन दिवसांत तुम्ही सहज जरी बोलायला गेला तरी समोरच्या व्यक्तीला तुमच्याविषयी गैरसमजच निर्माण होणार आहे. त्यामुळे कोणाला कुठलाही सल्ला देत बसू नका. स्पष्ट बोलल्यामुळे दुरावा येणार नाही याची काळजी घ्या.
तूळ : व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला मिळणार आहे. त्यामुळे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल हे निश्चित. नोकरदार वर्गाने समतोल साधावा. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. राजकीय क्षेत्रात नवीन कामाची सुरुवात होईल. मित्र-मैत्रिणींशी जपून संवाद करा. दिनांक १, २ या दिवसांत ठरवून एखादी गोष्ट करायची म्हटली तरीसुद्धा ती होणार नाही, त्या कामांमध्ये अडथळे येणार. हा अडथळा आल्यामुळे कोणतेच काम करायला उत्साह वाटणार नाही. त्यात समोरून काही वादाचे प्रसंग आले तर तुम्ही हा राग व्यक्त करणारच; तेव्हा हे दोन दिवस कामे उशिरा होणार आहेत हे लक्षात ठेवून काम केल्यास त्रास होणार नाही.
वृश्चिक : आगामी काळासाठी काही नियोजन करायचे आहे यासाठी प्रयत्न वाढवा. व्यवसायातील परिस्थिती चांगली होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. नोकरदार वर्गाला कामाची तासिका वाढवावी लागेल. आर्थिक मजबुती येईल. सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगला कालावधी असला की तुम्हाला शांत बसावेसे वाटत नाही. काहीतरी जुन्या गोष्टी उकरून काढायच्या आणि त्यावर गप्पा मारायच्या ही सवय जर बदलली तर चांगले दिवस चांगलेच जातील. होऊन गेलेल्या गोष्टींविषयी चर्चा करू नका.
धनू : या सप्ताहात सर्व दिवस खरेच चांगले आहेत. आता दिवस चांगले आहेत म्हणून काहीही करून चालणार नाही. ज्या वेळी इतरांनी आपले ऐकावे असे वाटत असते त्या वेळी आपणही इतरांचे ऐकावे लागते हे विसरू नका. हे चांगले दिवस म्हणजे एक प्रकारे संधी आहे असे समजा. ही संधी आपण गमावून बसणार नाही याची दक्षता घ्या. व्यावसायिक वाटचाल चांगली असेल. नोकरदार वर्गाला कामाचे नवीन प्रस्ताव येतील. राजकीय क्षेत्रात जबाबदारी वाढेल. शेजाऱ्यांशी अलिप्त राहाल. जोडीदाराच्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्या. बऱ्याच दिवसांतून सर्व दिवसांचा कालावधी चांगला आहे असे ऐकायला बरे वाटेल.
मकर : व्यवसायातून जे उत्पन्न मिळणार आहे त्याचा आगामी काळासाठी विचार करा. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप वाढल्यामुळे काम करण्यासाठी वेळ कमी मिळेल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हाल. भावंडांशी संपर्क साधाल. दिनांक २७ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. या चांगल्या दिवसांमध्ये महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. आपले काम आपणच वेळेत पूर्ण करणे किती महत्त्वाचे असते हा अनुभव आपण आजपर्यंत अनुभवलेला आहात.
कुंभ : व्यवसायात बरेच दिवसांपासून जे बदल करावयाचे आहेत ते बदल होत नव्हते; सध्या ते बदल झपाटय़ाने होऊ शकतात. नोकरदार वर्गाने कामात गुंतून राहिलेले चांगले. वायफळ खर्च टाळा. सध्या समाजसेवा बाजूला ठेवा. मैत्रीचे नाते दृढ होईल. दिनांक २८, २९ हे दोन दिवस शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी तसे होत नाही असे तुम्हाला जाणवेल हे तितकेच सत्य आहे. परंतु शांत राहिलात नाही तर स्वत:चीच अडचण वाढू शकते, त्यापेक्षा शांत राहिलेले चांगले. नियमांच्या चौकटीत राहूनच काम करा.
मीन : व्यावसायिकदृष्टय़ा खरेदी-विक्रीचे व्यवहार चांगले होतील. मात्र उधारीचे व्यवहार करू नका. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा राहील. राजकीय क्षेत्रात काम करताना नियमांचे पालन करा. दिनांक ३०, ३१ हे दोन दिवस फार जोर लावून कोणतेही काम करू नका. म्हणजेच जे काम होत नाही त्यासाठी विनाकारण आटापिटा करत बसू नका. हे दोन दिवस कासवाच्या चालीप्रमाणे असणार आहेत. या दोन दिवसांत नेहमीप्रमाणेच तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येईल.