मेष : व्यावसायिकदृष्टय़ा पारडे जड होईल. नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळेल. नोकरदार वर्गाला जी जबाबदारी मिळाली होती, ती पूर्णपणे पार पाडाल. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. सर्वच दिवस चांगले असल्यामुळे सध्या कोणतीही अडचण जाणवणार नाही. या चांगल्या दिवसाचा फायदा घेऊन आपली जी कामे बाकी आहेत ती करून घ्या. ज्या वेळी आपण कोणाकडून मदतीची अपेक्षा ठेवतो आणि ती मदत वेळेत न मिळाल्यामुळे कामात विलंब होतो. सध्या ही मदत वेळेत मिळणार आहे. तर हा चांगला वेळ वाया घालवू नका.
वृषभ : व्यवसायातील परिश्रम वाढतील. नोकरदार वर्गाला नियमावलीचे पालन करावे लागेल. या नियमांचे पालन केले नाही तर वरिष्ठांचे बोल खावे लागतील. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. सप्ताहातील वाटचाल प्रगतीकडे असेल. दरवेळी कोणता ना कोणता तरी दिवस काळजी वाढवणारा असतो. सध्या मात्र काळजी मिटणारे दिवस आहेत. ज्या कामासाठी आतापर्यंत वेळ मिळत नव्हता तो वेळ मिळेल. त्यामुळे केलेले नियोजन यशस्वी होईल. समोरून येणारे प्रस्ताव चांगले असतील, ते स्वीकारा.
मिथुन : आठवडय़ात शुभ ग्रहाची साथ उत्तम असेल. अशा वेळी आपणही या चांगल्या दिवसांचा उपयोग करून घेतला पाहिजे. संधी केव्हा मिळेल हे वाट पाहण्यापेक्षा स्वत:च संधी निर्माण करण्याची वेळ आली आहे. प्रयत्न तुमच्या हातातच आहेत. हे प्रयत्न यशस्वी होतील. चंचल वृत्ती राहिली तरी निर्णय ठामपणे घ्या. व्यवसायवाढीसाठी जाहिरात माध्यमांचा वापर करणार आहात. त्याचा निश्चितच फायदा होईल. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव चांगला राहील. आर्थिक आवक वाढेल. नातेवाईक, शेजाऱ्यांशी जेवढय़ास तेवढे राहा. कुटुंब आनंदी असेल. प्रकृती ठणठणीत राहील.
कर्क : व्यावसायिकदृष्टय़ा खरेदी-विक्री करताना तोंडी व्यवहार टाळा. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. नोकरदार वर्गाचे काम वेळेत पूर्ण होईल, त्यासाठी धावपळही तेवढीच होईल. खर्च जपून करा. समाजसेवा करताना स्पष्टवक्तेपणा टाळा. कुटुंबाशी वादविवाद टाळा. जोडीदाराचे आरोग्य सुधारेल. दिनांक १६, १७ रोजी प्रत्येक गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. इतरांचे ऐकून स्वत:चे नुकसान करून घेऊ नका. धीर धरून काम करा, म्हणजे नुकसान होणार नाही. ‘एक ना धड भाराभर चिंध्या ’असे न करता एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे चलबिचल होणार नाही. अमावास्या कालावधीत महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.
सिंह : आळस बाजूला ठेवून काम करण्याचा निश्चय करा. वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. अमावास्या लाभस्थानातून होत आहे. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात धरसोड वृत्ती टाळा. मोठय़ा गुंतवणुकीचा परिणाम नुकसानकारक होऊ शकतो. त्यामुळे मोठी गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाला कामामध्ये होणारी धावपळ कशी कमी करता येईल ते पाहा. वायफळ खर्च करू नका. दिनांक १८, १९ हे संपूर्ण दिवस २० तारखेला सकाळी ११ पर्यंत असा हा कालावधी जेमतेम राहील. दिनांक २०, २१, २२ असे हे तीन दिवस अस्वस्थता जाणवणार आहे. जी कामे वेळेत व्हावी असे वाटत असते तीच कामे नेमकी उशिरा होणार आहेत. त्यामुळे चिडचिड होईल. परंतु ही चिडचिड तुमच्यासाठीच त्रासदायक असेल.
तूळ : त्रास जाणवला तो या आठवडय़ात जाणवणार नाही. सरळमार्गी वाटचाल राहील. प्रत्येक गोष्टीत यश मिळत जाईल. समोरून येणारे प्रस्ताव आपल्या फायद्याचे असतील. ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत आहात त्या गोष्टी आता पूर्ण होणार आहेत. व्यावसायिकदृष्टय़ा आतापर्यंत जी धावपळ केली त्याचे फळ निश्चितच चांगले मिळणार आहे. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. आर्थिकदृष्टय़ा दुहेरी लाभ मिळेल. मुलांची शिस्त बिघडू देऊ नका.
वृश्चिक : व्यावसायिकदृष्टय़ा संघर्ष जाणवला तरी तो थोडय़ा दिवसांनी निवळणार आहे. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या मर्जीने वागावे लागेल. आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. दिनांक १६, १७ हे दोन दिवस धीर धरून सुवर्णमध्य साधा. एखाद्या गोष्टीचा कितीही राग आला तर तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे काय होईल याचे उलट परिणाम बघायला मिळतील. त्यापेक्षा एखाद्या गोष्टीच्या खूप तळाशी जाणे सोडून दिलेले चांगले. जी गोष्ट पटत नाही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा. एक शब्द बोलल्याने चार शब्द ऐकून घेण्यापेक्षा न बोललेले चांगले.
धनू : दिनांक १८, १९ या दोन दिवशी ठरवून कोणतीच गोष्ट होणार नाही. या गोष्टीपासून त्रास आहे हे तुम्हाला माहीत असूनही त्याच गोष्टीचा ध्यास धरला तर नुकसान होऊ शकते. रागाच्या भरात घेतलेले निर्णय त्रासाचे ठरू शकतात. त्याचा नंतर पश्चात्ताप करण्यात अर्थ नाही. तेव्हा वेळीच ही परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ करू नका. व्यापारी वर्गाने अंदाज घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाचे कामाचे नियोजन पक्के असेल. कुटुंबात घेतले जाणारे निर्णय सर्वाना विश्वासात घेऊन मगच घ्या. अमावास्या कालावधी ठीक राहील. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल.
मकर : सप्ताहात सर्व दिवस अनुकूल असतील असे नाही. जुन्या आठवणी काढून बोलत बसलात तर त्यावर वाद होऊ शकतो व आपल्याकडून तीव्र प्रतिक्रिया बाहेर पडू लागतील. तेव्हा अशा प्रतिक्रिया टाळा. पेटलेल्या अग्नीत तेल ओतले तर अजूनच भडका होणार आहे, असे हे वातावरण आहे. तेव्हा हे वातावरण शांततेने हाताळा. अमावास्या कालावधीत ‘आपले काम भले नि आपण भले’ असाच दिवस पार पाडा. व्यवसायात जे चालले आहे ते चांगले समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कामात लक्ष केंद्रित करावे. विनाकारण होणारा खर्च टाळा. कुटुंबाशी दुरावा येणार नाही याची काळजी घ्या.
कुंभ : बेकायदेशीर गोष्टींना थारा देऊ नका. अमावास्या चांगली जाईल. बाकी दिवसही चांगले असतील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी कामाचे वेळापत्रक आधी तयार करावे लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. दिनांक १८, १९ हे दोन दिवस ‘हाताची घडी तोंडावर बोट’ असे करणे सर्वात उत्तम राहील. म्हणजे काहीच बोलू नका असे नाही. या दोन दिवसांत आपले मत इतरांना पटणारे नसेल. अशा वेळी आपण काही बोलायला गेल्यास समोरच्याने आपला आदर न केल्यास वातावरण बिघडू शकते व बोलण्यातील तोलही घसरू शकतो. तेव्हा आपली देहबोली सांभाळा.
मीन : दिनांक २०, २१, २२ या तीन दिवसांत जे बदल होणार आहेत ते स्वीकारून पुढे चला. त्यामुळे त्रास होणार नाही. जे काम पूर्ण होण्याच्या मार्गी असेल आणि अचानकच ते काम पुढे ढकलले जाणार आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल त्या वेळी तुमची प्रतिक्रिया काहीशी तीव्र असणार आहे. आपला राग इतरांवर काढण्यापूर्वी विचार करा. या तीन दिवसांच्या कालावधीत सहनशीलता वाढवा. अमावास्या दिवस ठीक राहील. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायवाढीसाठी समोरून येणारे प्रस्ताव स्वीकारू नका.