चंद्रपुर (वृत्तसंस्था) सेल्फीच्या नादात चार युवक नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. सेल्फी काढत असताना चौघेही तलावात पडले. परंतु पोहता न आल्याने चारही जण पाण्यात बुडाले. मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडे (२७), चेतन मांदाळे (१७, रा. शेगाव), संकेत मोडक (२५, रा. गिरोला) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
शेगाव आणि गीरोला येथील चार तरुण चिमूर तालुक्यातील आठ तरुण मुक्ताई धबधबा येथे पर्यटनासाठी गेले होते. सकाळी १० च्या सुमारास ते मुक्ताई धबधबा येथे पोहोचले. परंतु, दोन दिवसांपूर्वी डोमा येथील रहिवासी डोमा सोनवणे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडल्याने मुक्ताई धबधबा पर्यटनासाठी वनविभाग आणि पोलीस विभागाकडून बंद करण्यात आला होता. त्यामुळे हे सर्व जण मुक्ताई धबधब्यावरून नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पाहण्यासाठी गेले होते.
तलावावर पोहोचल्यानंतर चौघांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. सेल्फी काढत असतानाच एक तरुण तलावातील खोल पाण्यात पडला. त्याच्यानंतर तीन युवक लागोपाठ घसरून पडले. यानंतर एकमेकाला वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उर्वरित इतर चौघांनी त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, संध्याकाळी उशिरापर्यंत तलावाच्या पाण्यात मृतदेहांचा शोध घेण्यात आला. मात्र एकाचाच मृतदेह सापडला. पुढील तपास नागभीड पोलीस करत आहेत. दरम्यान, शेगाव आणि गिरोला येथे या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
चंद्रपुरातील पथकाकडून शोधमोहीम घोडाझरी तलावात चार युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर स्थानिक कर्मचाऱ्यांकडून शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास चंद्रपुरातील शोधपथकाने मोहीम सुरू केल्यानंतर एकाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. हे पथक मुक्कामी राहणार असून, सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबवली जाणार आहे.