लातूर (वृत्तसंस्था) भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकिला समोरुन दिलेल्या धडकेत दुचाकिवरील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील संगारेड्डीवाडी येथील पाटी पासून सावरी- हालगरा रस्त्यावर शुक्रवारी (दि.१६) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. तानाजी ज्याेतीराम खामकर (वय ५५) आणि सुकुमारबाई तानाजी खामकर (वय ५०) असे मयत पती-पत्नीची नावं आहेत.
निलंगा तालुक्यातील संगारेड्डीवाडी येथील तानाजी ज्योतीराम खामकर आणि त्यांची पत्नी सुकुमारबाई खामकर हे दोघे शुक्रवारी दुपारच्या सुमारास औराद शहाजानी येथील बँकेत शेतकरी सन्मान निधीकरिता केवायसी करण्यासाठी निघाले होते. दरम्यान, त्यांची दुचाकि संगारेड्डीवाडी येथील पाटी पासून सावरी हालगरा रस्त्यावर आली असता समोरुन भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने (एमएच २४ एएस ८९३७) समोरुन त्यांना जोराची धडक दिली.
या अपघात खामकर दांपत्य जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला असून या संदर्भात औराद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास औराद शहाजानी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ विष्णू गिते, पो. कॉ. लतिफ सौदागर हे करीत आहेत. पती-पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.