अमळनेर (प्रतिनिधी) शेतात निंदणीसाठी गेलेल्या तालुक्यातील निम येथील ३३ वर्षीय विवाहित तरुणाचा शेतात झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वासुदेव रामसिंग पाटील उर्फ लोटन (३३), असे मयत तरुणाचे नाव आहे.
निम येथील वासुदेव पाटील (३३) हा आई वडिलांसह कळमसरे रस्त्यावरील शेतात निंदणीसाठी गेला होता. दुपारी त्याचे आईवडील घरी आले. मात्र तो निंदणी कामासाठी शेतातच थांबून होता. साडेचार वाजले तरी वासुदेव परत आला नाही, म्हणून त्याची आई त्याला पाहण्यासाठी गेली असता तो शेतातील झाडाखाली झोपलेला आढळून आला.
आईने त्याला उठवले असता तो उठत नसल्याने त्याला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून गाडीत टाकून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. रणछोड पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. ना. मुकेश साळुंखे करीत आहेत. दरम्यान, अद्याप मृत्यूचे नेमकं कारण समजून आलेले नाही.