नवी दिल्ली(वृत्तसंस्था) मागील पाच वर्षांत भ्रष्ट उद्योगपतींचे १० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. यावरून भाजप खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मुफ्त की रेवडी’ या टिप्पणीवरून केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
कर्जबुडव्या उद्योगपतींच्या प्रश्नावर सरकारने संसदेत दिलेल्या उत्तरातील ‘टॉप १०’ कर्जबुडव्यांची यादी वरुण गांधी यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केली. ‘जी संसद गरिबांना पाच किलो रेशन दिल्यानंतर त्यांच्याकडून आभाराची अपेक्षा करते, त्याच सभागृहात सरकारने मागील पाच वर्षांत भ्रष्ट उद्योगपतींची १० लाख कोटींची कर्ज माफ केल्याची माहिती दिली आहे. ही ‘फुकटची रेवडी’ घेणाऱ्यांमध्ये मेहुल चोक्सी आणि ऋषी अग्रवाल यांचे नाव आघाडीवर आहेत. सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क कोणाचा असायला हवा?’ असा प्रश्न वरुण यांनी ट्विटरवरून हिंदीतून केला आहे.
करोनाची साथ आल्यापासून पंतप्रधान मोदी ८० कोटी गरिबांना विनामूल्य अन्नधान्य देत असल्याचे अन्य एका भाजप खासदाराने लोकसभेत चर्चेत म्हटले होते. त्या संदर्भात वरुण गांधी यांनी हे विधान केले. निवडणुकीत लाभासाठी फुकट वस्तू वा सेवा देण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांची पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच ‘मुफ्त की रेवडी’ असे म्हणत खिल्ली उडवली होती. दरम्यान, कर्जबुडव्यांच्या यादीतील दोन कंपन्या चोक्सी आणि अग्रवाल यांच्याशी संबंधित आहेत.