मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे. तसेच, सरकारवर टीका करणाऱ्यांचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. मास्क न लावण्यात कसलं शौर्य?, असे म्हणत राज ठाकरेंना लक्ष्य केलं.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही, तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
लॉकडाऊन करु नका, असे म्हणणाऱ्या विरोधकांना आणि सल्ले देणाऱ्या उद्योजकांनाही मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमधून टोला लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता नुसते सल्ले देण्याचे ‘उद्योग’ नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे. तर, मास्क न वापरणाऱ्यांवरही जबरी प्रहार केलाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावरुन, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता टोला लगावला. अनेकजणांना असं वाटतंय, ये मास्क का लावतोय तू. पण, मास्क न लावण्यात शौर्य काय, मी मास्क वापरणार नाही, मग काय शूर आहेस का? असा प्रश्न विचारत खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. मास्क घालण्यात लाज कसली, मास्क न लावणे यात शूरता नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका.किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्ह.’, असे ट्विट देशपांडे यांनी केलंय. म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत, त्यांनी ११ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं सूचवलं आहे.