चंद्रपूर (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सोन्यापाठोपाठ हिऱ्याची खाण सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घोडेवाही गावात हिऱ्याची खाण असल्याचं संशोधनातून समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ही खाण चक्क एका घरातील स्वंयपाक खोलीतील चुलीच्या खाली सापडली आहे.
चुलीखाली हिऱ्याची खाण सापडल्याची घटना घोडेवाही गावातील ज्ञानेश्वर तीवाडे यांच्या घरी घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील घोडेवाही आणि पाथरी इथे 1997-98 साली भूगर्भ वैज्ञानिकांनी संशोधन केलं होतं. त्यावेळी सुमारे पाच कि.मी.च्या परिसरात हिऱ्यांचा साठा असल्याचं संशोधकांनी ग्रामस्थांना सांगितलं होतं. सुमारे दीड महिना संशोधकांनी गावात ठाण मांडलं होतं. गावाचा भूगर्भात हिऱ्याची खाण असल्याच्या चर्चेनंतर परिसरातील जमिनीचे भावही वधारले होते. या संशोधनाला पंचवीस वर्षाच्या काळ उलटला. मात्र हिरे बाहेर काढण्यासाठी कुठलीच हालचाल झाली नव्हती. परंतू आता हिऱ्याची खाण सापडल्याचे समोर आल्यानंतर ग्रामपंचायत खाणीचे उत्खनन करण्यासाठी पुढे सरसावली आहे. दरम्यान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार 15 व्या शतकापासून वैरागड ,गडचिरोली परिसरात हिरे आढळले होते. इंग्रजांनी पण इथे उत्खनन केले.पण मुबलक हिरे आढळले नव्हते. विभाजन पूर्व चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड या परिसरात हिराच्या खाणी असल्याची नोंद इतिहासात सापडतात. त्यासाठी युद्धही झाले आहेत. ब्रिटिश काळातसुद्धा हिरे काढण्याचा प्रयत्न झाला होता. वैरागड परिसरात आजही त्याचा खाणाखुणात दिसतात.