नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मधुमेह (Diabetes) या दुर्धर आजाराची लागण झाली, की माणसाला आयुष्यभरासाठी गोळ्या आणि इंजेक्शनची गरज भासते. अशात टाईप-2 डायबेटिस (Type 2 diabetes) असणाऱ्यांसाठी अमेरिकेतील संशोधकांनी एक नवी उपचार पद्धती शोधली आहे. विशेष म्हणजे या उपचार पद्धतीमध्ये कसल्याही प्रकारच्या गोळ्या औषधे किंवा इंजेक्शनची गरज भासत नाही. अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार अमेरिकेतील जीई रिसर्चच्या एका पथकाने ही नवी उपचार पद्धती शोधली आहे.
या पथकामध्ये येल स्कूल ऑफ मेडिसीन आणि फेंस्टीन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधकांचा समावेश आहे. डायबेटिक व्यक्तीच्या लिव्हरवर अल्ट्रासाउंड किरणांचा मारा करून, शरीरातील इन्शुलिन आणि ग्लुकोजचा स्तर कमी करणं, अशी ही एकूण प्रक्रिया आहे. नेचर या विज्ञानविषयक मॅगझिनमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या उपचार पद्धतीला पेरिफेरल फोकस्ड अल्ट्रासाउंड स्टिम्युलेशन असं नाव देण्यात आले आहे.
कशी आहे प्रक्रिया
संशोधकांनी सांगितलं, की यकृतामध्ये पोर्टा हेपॅटिस नावाच्या भागात पाठीपासून येणाऱ्या मज्जातंतूंचं जाळं असतं. हे मज्जातंतूच मेंदूला शरीरातील ग्लुकोज आणि इतर पोषकतत्त्वं किती प्रमाणात आहेत हे सांगत असतात. हे मज्जातंतू आकाराने अगदीच लहान असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड असतं. मात्र, अल्ट्रासाउंड किरणांच्या मदतीने या मज्जातंतूंना संदेश पोहोचवणं सोपं होतं. या प्रयोगावेळी आम्ही यकृताच्या पोर्टा हेपेंटिस भागात pFUS अल्ट्रासाउंड किरण सोडली. या माध्यमातून हाय व्लड शुगर पुन्हा नॉर्मल करण्यात आम्हाला यश मिळालं.
अद्याप मानवी चाचणी बाकी
नेचर मॅगझिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अद्याप केवळ उंदीर आणि डुक्कर या प्राण्यांवर या उपचार पद्धतीची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. केवळ तीन मिनिटं अल्ट्रासाउंडचा मारा करून संशोधकांना या प्राण्यांमधील साखरेचा स्तर पूर्णपणे सामान्य करण्यात यश मिळालं. त्यामुळे आता याची माणसांवर चाचणी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
तीन मिनिटांत शुगर होणार नॉर्मल
या उपचार पद्धतीची मानवी चाचणी यशस्वी ठरली तर तो एक मैलाचा दगड ठरणार आहे. भविष्यात आपण अल्ट्रासाउंडचा मारा करणारी छोटी उपकरणं तयार करू शकतो, जी रुग्णांना आपल्या घरी वापरता येतील. या उपकरणांच्या मदतीने दररोज काही मिनिटांमध्येच लोक आपली ब्लड शुगर नियंत्रणात आणू शकतील. यामुळे गोळ्या औषधं किंवा इन्शुलिनच्या इंजेक्शनचा त्रास इतिहास जमा होईल. डायबेटिसवरील ही उपचार पद्धती अंमलात आल्यास जगभरातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. हे टेक्निक डायबेटिसच्या उपचारांमध्ये नक्कीच गेमचेंजर ठरणार आहे.