जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने पुढेही हा धनुष्यबाण आम्ही पेलू. प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा, घोडा मैदान लांब नाही. तेव्हाच चित्र स्पष्ट होईलच, असे आव्हान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना रविवारी जळगावात दिले.
जळगाव महापालिकेच्या वतीने महामार्गावर उभारण्यात आलेल्या दिव्यांचा शुभारंभ गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रविवारी रात्री ८ वाजता करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सभेत धनुष्यबाण रावणाकडूनही पेलवला गेला नाही, असे म्हणत शिंदे सेनेवर टीका केली. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमात उत्तर दिले. ना. पाटील म्हणाले धनुष्यबाण कोणाकडून पेलवला आणि कोणाकडून पेलवला गेला नाही, हे सगळ्यांना माहित आहे. हाच धनुष्यबाणावर ३५ वर्षे आमच्याच हातात होता. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने पुढेही हा धनुष्यबाण आम्ही पेलू. या कार्यक्रमाला महापौर जयश्री महाजन, नगरसेवक ललित कोल्हे, आश्विन सोनवणे, अॅड. शुचिता हाडा, उज्ज्वला बेंडाळे, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील हे उपस्थित होते.