पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी (Dr Anupam Kashyapi) यांनी मान्सूनच्या आगमनाच्या स्थितीबद्दल सांगितले आहे. महाराष्ट्रासाठी उपयुक्त मान्सून 27 मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सून हा वेळेआधीच संपूर्ण महाराष्ट्रभर दाखल होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेचा अनुभव येत आहे. अशातच नैऋत्य मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तसेच महाराष्ट्रासाठी उपयुक्त मान्सून 27 मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सून हा वेळेआधीच संपूर्ण महाराष्ट्रभर दाखल होईल अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी दिली.
मध्यंतरी असनी चक्रीवादळ आणि इतर वादळे बंगालच्या उपसागरात निर्माण झाले होते. यामुळे मान्सून लवकर महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आदी ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे काही दिवस वातावरण ढगाळ असेल. मान्सून सोबतच विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहू शकते आहे अशी माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे.