अकोला (वृत्तसंस्था) पत्नी नागपूरवरून अकोल्यातील प्रियकराला भेटायला आली. ही बाब पतीला कळल्यानंतर पतीने अकोल्यात येऊन प्रियकराला चांगलाच चोप दिला. नंतर प्रकरण रामदासपेठ पोलिसांपर्यंत पोहोचलं. या प्रकरणाने पोलिसांचेही डोके चक्रावून गेलं.
एक विवाहिता बॅग घेऊन तीन दिवसांपूर्वी अकोल्यातील मलकापूर भागात राहणाऱ्या प्रियकराला भेटायला आली. प्रियकरही विवाहित असल्याने त्याने तिला रेल्वे स्टेशनवरील एका धर्मशाळेत बोलावलं. याठिकाणी दोन दिवस ही विवाहिता प्रियकरासोबत राहिल्यानंतर पती नागपूरवरून अकोल्यात पोहोचला. त्याने पत्नीचा शोध घेतला असता, पत्नी प्रियकरासोबत दिसली. त्याने तिला नागपुरला चलण्याचा आग्रह केला असता, प्रियकर आणि पतीदरम्यान वाद झाला. न्यायालय परिसरातच पती व प्रियकरामध्ये चांगलीच फ्रीस्टाईल झाली. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली. नंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी पती, पत्नी आणि वो…अशा तिघांनाही पोलीस ठाण्यात नेलं आणि प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. दोघांची समजूत काढून पत्नीला पतिसोबत पाठवण्यात आलं.
पोलिसांनी समुपदेशन करून केली रवानगी
विवाहित प्रियकर-प्रेयसीचे प्रकरण समोर आल्यानंतर रामदासपेठचे ठाणेदार किशोर शेळके यांनी प्रियकराच्या कुटुंबियांना बोलावून घेतलं. विवाहित प्रेयसीचे व तिच्या पतीचे समुपदेशन करून त्यांची समजूत काढून त्यांना नागपुरला पाठवून दिलं. त्यानंतर विवाहित प्रियकरालासुद्धा चांगल्या शब्दांमध्ये समज देत कुटूंबिय आणि पत्नीच्या ताब्यात दिलं.















