मुंबई (वृत्तसंस्था) अनेक दिवसांपासून परमबीर सिंग गायब असल्याचं वृत्त आहे. परमबीर सिंह कुठे आहेत?, असा प्रश्न राज्यशासनासह पोलिसांनाही पडला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी दिलं आहे. संजय निरूपम यांनी ट्विटमध्ये परमबीर सिंग बेल्जियमला आहेत. ते बेल्जियममध्ये कसे गेले?, असा सवाल उपस्थित केला आहे.
याबद्दलचं एक ट्वीट संजय निरुपम यांनी केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “हे मुंबई पोलिसांचे माजी पोलिस आयुक्त. मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की हे फरार आहेत. माहिती मिळाली आहे की ते बेल्जियमला आहेत. ते बेल्जियमला कसे गेले? यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का?”
दरम्यान, परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.