फैजपूर (वृत्तसंस्था) देशात सध्या महिलांवरील अन्याय अत्याचार सातत्याने वाढतच आहे. नुकतेच रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड तसेच हाथरस येथील प्रकरण हे मानवी जिवनाला काळीमा फासणारे आहे. अशा घटना घडू नये यासाठी कन्या पूजनाद्वारे मुलींबद्दल बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आपण बदलवू शकतो अशा कार्यक्रमा निमित्ताने त्याला आळा घालता येतो व घटना थांबवू शकतो. जेथे नारीचा आदर होतो तेथे देवाची उपस्थिती असते. तेथे लक्ष्मी सरस्वतीचा वास असतो, असे प्रतिपादन परम पूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले आहे.
नवरात्र उत्सव दरम्यान नवमीच्या दिवशी तब्बल ९० लहान कन्यांचा सन्मान सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वढोदा येथील निष्कलंक धाम मधील तुलसी भवनमध्ये करण्यात आला होता. महाराजांनी बाल कन्यांचे पाय धुऊन- पुसून त्यांना भेटवस्तू ( ऋतू पालकत्वाचे पुस्तक, हात रुमाल, मेहंदी कोन, कानातील, टॉप्स, बिंदी, चॉकलेट, मोत्याची माळ, गजरा, जेल पेन, शबनम, मास्क, यथाशक्ति दक्षिणा) देऊन पोटभर जेवण घातले. प्रत्यक्ष जगदंबेचे स्वरूप समजून त्यांचे हळद कुंकवाने पूजन केले. यावेळी त्या बालिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता.यावेळी सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी संजीव महाजन मिलिंद भिरुड, चतुर महाजन, हिरामण शेठ भिरुड, विलास चौधरी, बल्लू सेठ गॅरेज वाले भुसावळ यांचेसह मुखी परिवार व भक्तगण उपस्थित होते.