धुळे (प्रतिनिधी) शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई करुन अटक न करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस नाईक लक्ष्मीकांत पंढरीनाथ टाकणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस ठाण्यातच पोना टाकणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
शिरपुर येथील रहिवाशी असलेल्या तक्रारदाराविरुध्द शिरपुर शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरुन प्रतिबंधात्मक कारवाई करुन अटक न करण्याकरीता पोलीस नाईक लक्ष्मीकांत पंढरीनाथ टाकणे यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत त्यांनी दि. २१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात तक्रार दिली.
या तक्रारीची एसीबीच्या पथकाने काल (दि.२२) पडताळणी केली असता, पोलीस नाईक लक्ष्मीकांत टाकणे यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा लावून पोलीस नाईक टाकणे यांना लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक टाकणे यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.