सिल्लोड (वृत्तसंस्था) ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून नोकरीला लावतो, असे म्हणून एक लाखाची लाच स्वीकारणाऱ्या केळगाव (ता. सिल्लोड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पती व उपसरपंच या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सरपंच पती अशोक राजाराम वाघमोडे व उपसरपंच बबन रामसिंग चव्हाण, (दोघे रा. केळगाव, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) अशी आरोपींची
नावे आहेत. या दोघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांना केळगाव ग्रुप ग्रामपंचायतमध्ये वसुली कारकून म्हणून कामावर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव केला. त्यानंतर सहा महिन्यांनंतर त्याला कायम करताना ५० हजार रुपये घेतले. कालांतराने पंचायत समितीने तक्रारदार यांना कायम करून नियमित पगार सुरू केला. तेव्हा ग्रामपंचायतीत लिपिक व वसुली कारकून यापैकी एकच पद भरता येणार होते, असे उपसरपंच व सरपंच यांचे पती यांना माहीत झाल्याने त्या दोघांनी मिळून तक्रारदार यास आम्हास लिपिक पदासाठी एकाने तीन लाख रुपये दिले तेव्हा तू आम्हास तीन लाख दे नाही तर आम्ही तुझ्या विरुद्ध ठराव घेऊन तुला काढू, असे सांगितले. त्यानंतर तडजोडीअंती २ लाख रुपये दोन टप्प्यांत देण्याचे ठरले. त्यातील १ लाख तत्काळ देण्याचे ठरले.
मात्र, लाच देण्याची इच्छा तक्रारदार यांना नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी सरपंच पती अशोक राजाराम वाघमोडे व उपसरपंच बबन रामसिंग चव्हाण यांना ग्रुप ग्रामपंचायत आधारवाडी शिवारात १ लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल फुला, सहायक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोडके, कर्मचारी रवींद्र काळे, राजेंद्र सिनकर, शिरीष वाघ, चालक चंद्रकांत शिंदे यांनी यशस्वी केला.