नंदुरबार (वृत्तसंस्था) कामाच्या बिलांचे धनादेश देण्याच्या मोबदल्यात एकूण बिलाच्या २० टक्के रक्कम याप्रमाणे सुमारे सहा लाख ४७ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकासह एका खाजगी पंटरला तळोदा येथे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. रात्री उशिरापर्यंत सदरची कारवाई सुरू होती.
तक्रारदार यांची पत्नी अक्कलकुवा तालुक्यातील सिंदुरी येथे सन २०१६ ते २०२० या कालावधीत सरपंच होत्या. यानंतर ग्रामपंचायतीवर शासनाचे प्रशासक कार्यरत होते. या काळात ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर असलेले रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे अशी विविध आठ प्रकारची ग्रामपंचायतीत मंजूर असलेली कामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पूर्ण केली आहेत. नमूद कामे पूर्ण झाल्यानंतर कामांबाबतचे बिल ३२ लाख ३४ हजार रुपये इतके ग्रामपंचायत सिंदुरीच्या बँक खात्यात शासनाकडून आले आहेत.
सदर कामांच्या बिलाचे धनादेश देण्याच्या मोबदल्यात अक्कलकुवा पंचायत समितीतील ग्रामसेवक मनोज पावरा व खाजगी इसम लालसिंग सिमजी वसावे (रा. गमन, ता अक्कलकुवा) यांनी बिलाच्या २० टक्के रक्कम अर्थात एकूण सहा लाख ४७ हजार रुपये इतक्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली होती. दरम्यान, रात्री सात वाजेच्या सुमारास सदरची रक्कम तळोदा येथे पंच व साक्षीदारांसमक्ष स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदरची कारवाई सापळा अधिकारी एसीबीचे पोलीस उप अधीक्षक राकेश चौधरी यांच्यासह सापळा पथकातील कर्मचारी हेकॉ. विलास पाटील, देवराम गावित, पोना. संदीप नावाडेकर, नरेंद्र पाटील, सुभाष पावरा, संदीप खंदारे, हेमंत महाले, जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली आहे. मदत पथकात पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोहेकॉ. विजय ठाकरे यांचा समावेश होता. रात्री उशिरापर्यंत सदरची कारवाई सुरू होती.