राजस्थान (वृत्तसंस्था) ईअरफोन वापरणं आज सामान्य गोष्ट झाली आहे. गाणी ऐकण्यासाठी आणि फोनवर बोलण्यासाठी अनेकजण हमखासपणे ईअरफोनचा वापर करताना दिसतात. पण हे ईअरफोन वापरणं एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं याचा कुणी विचारही केला नसेल. राजस्थानच्या जयपूर जिह्यात एका २८ वर्षीय तरूणाच्या थेट जीवावर बेतलं आहे. ज्यात तरूणाच्या कानात ईअरफोन स्फोट झाल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे ब्लूटूथ हेडफोन चार्जिंगला लावले असता त्यांचा स्फोट झाला. यामुळेच या तरूणाला जीव गमवावा लागला. राकेश नागर असं २८ वर्षीय मृत तरूणाचं नाव आहे. हा तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. चौमु शहरातील उदयपुरिया गावात हा अपघात झाला. राकेश नागर हा घरात ब्लूटूथ हेडफोन लावून बसला होता आणि त्याला चार्जिंग प्लगशी देखील त्याने जोडलं होतं. अचानक हेडफोनचा स्फोट झाला आणि तो तरुण बेशुद्ध झाला. या घटनेनंतर त्याला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.