पुणे (वृत्तसंस्था) अंगणात खेळताना सर्पदंश झाल्याने भोर तालुक्यातील खानापूरमधील अंगणवाडीत शिकणाऱ्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ९) घडली आहे. रघुनाथ मारुती भालेराव ( वय ५) असे मृताचे नाव आहे.
भोर तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने सध्या वातावरणात उकाडा वाढला आहे. परिणामी, साप गारव्यासाठी घराशेजारील गवत-वेलींचा आधार घेत आहेत. दरम्यान, लपून बसलेले साप लहान मुले, तसेच नागरिकांना चावा घेण्याचे प्रकार तालुक्यात वाढले आहेत. रघुनाथ हा खानापूर येथील घराशेजारील अंगणात मोठ्या बहिणीबरोबर खेळत होता. या वेळी अचानक गवतात लपून बसलेल्या सापाने त्याला दंश केला. मात्र, रघुनाथ हा वयाने लहान असल्याने त्याला सर्पदंश झाल्याचे समजून आले नाही. रात्री उशिरा त्याला त्रास होऊ लागल्याने भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या वेळी रघुनाथ याला सर्पदंश झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला तत्काळ पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. रघुनाथचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने खानापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हसत्या खेळत्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्यामुळे आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश केला होता.