नागपूर (वृत्तसंस्था) शिर्डी-शेगाव येथून दर्शन करून नागपूरकडे परतणाऱ्या भरधाव कारला डाव्या बाजूने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. कार अनियंत्रित झाल्याने ती रस्तादुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील एकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू आणि तिघे गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना अमरावती-कोंढाळी मार्गावर रविवारी (१८ जून) पहाटे चार वाजताच्या सुमारास राजस्थान ढाब्यासमोर घडली. ब्रिजेश लखन गोन्नाडे (४७, रा. राजनांदगाव, छत्तीसगड), युवराज व्यंकट बेहेरे (५२, रा. गडचिरोली) अशी मृतकांची तर सुनीता ब्रिजेश गोन्नाडे (४३, रा. राजनांदगाव), चेतना युवराज बेहरे (४५, रा. गडचिरोली), कारचालक हृषिकेश (२७, रा. गडचिरोली) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
राजनांदगाव येथील गोन्नाडे व गडचिरोलीच्या बेहेरे कुटुंबातील काही जण झायलो व वॉगनार कारने शिर्डी- शेगावला दर्शनासाठी गेले होते. शेगावला दर्शन आटोपल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला लागले. शेगाववरून १७ जूनला रात्री ते नागपूरकडे निघाले. यादरम्यान वॉगनार कार क्रमांक (एमएच ३३ / व्ही ३४२०) ला कोंढाळीपासून आठ किमीवर पहाटेच्या सुमारास मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने डाव्या बाजूने जोराची धडक दिली. कार अनियंत्रित होऊन रस्तादुभाजकावर जाऊन आदळली. त्यामुळे अज्ञात वाहनचालक वाहनासह फरार झाला. या अपघातात कारमध्ये समोर बसलेल्या ब्रिजेश गोन्नाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले. पुढे युवराज यांचा उपचारदरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला.
अपघात एवढा भीषण होता की, मृतदेह कार तोडून बाहेर काढायला पोलिसांना एक तास लागला. पोलिसांनी जखमींना कोंढाळी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांच्या मदतीने कोंढाळी प्राथमिक आरोग्यकेंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष तायवाडे यांनी प्रथमोपचार करून जखमींना तीन रुग्णवाहिकेने नागपूरला रवाना केले. जखमींना नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र युवराज बेहेरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.