जळगाव (प्रतिनिधी) ‘ओबीसी आरक्षणाचं आंदोलन करताना खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना,’ असा बोचरा सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करून फडणवीसांना केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षानं आज राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनाच्या निमित्तानं राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडं, रोहिणी खडसे यांनी भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी आज एक ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी भाजपच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. ‘ओबीसी आरक्षणाचं आंदोलन करताना माननीय खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना,’ असा बोचरा सवाल रोहिणी खडसे यांनी फडणवीसांना केला आहे.
राज्य सरकारकडून इम्पिरिकल डाटा मागितला होता ना ?
रोहिणी खडसे यांनी कालही या संदर्भात ट्वीट करत फडणवीसांना लक्ष्य केलं होतं. ‘आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर १ ऑगस्ट २०१९ रोजी आणि १८ सप्टेंबर २०१९ रोजी केंद्र सरकारनं राज्य सरकारकडून इम्पिरिकल डाटा मागितला होता ना? तो केंद्राला दिला गेला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारे केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाहीत, हे तुम्हाला माहीत व्हायला हवे होते,’ असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.