मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा (10th and 12th Board exams) घेण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आज विद्यार्थ्यांनी (Board students protest in Maharashtra) संपूर्ण राज्यभरात आंदोलन केलं. मात्र अचानक विद्यार्थी रस्त्यावर का उतरले? नक्की विद्यार्थ्यांच्या मागण्या काय? आणि ऑनलाईन परीक्षांवर विद्यार्थ्यांचा भर का? याबद्दल जाणून घेऊया.
आता शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. शाळांचं हे सतत बंद आणि चालू होण्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. असं असेल तरी ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन पद्धतीनंच शाळा सुरु ठेवावी असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी आज राज्यभरात ठिकठिकाणी ऑफलाईन परीक्षांविरोधात मोर्चे काढत घोषणाबाजी केली आहे. इतकंच नाही तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून आता यंदाच्या १०वी, १२वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत केली होती. मात्र त्यानंतर कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट omicron नं परत चिंता वाढवली आणि राज्यातील शाळा आणि कॉलेजेस पुन्हा बंद करण्याची वेळ आली होती. मात्र आता शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. तरीही बोर्डाच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनच होणार अशा मतावर शिक्षणमंत्री ठाम आहेत.
काय आहे विद्यार्थ्यांची मागणी
“संपूर्ण वर्ष आमचं शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आलं आणि आता परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं का? त्यामुळे परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनंच घेण्यात याव्यात” अशी मागणी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण राज्यभरात करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
अचानक का पेटला मुद्दा
मात्र हा मुद्दा अचानक का पेटला हे समजून घेणं आवश्यक आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनंच घेण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली होती. तसंच यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी अडचणी येतील असा विचार बहुतेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असावा म्हणूनच राज्यभरात ऑफलाईन परीक्षांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तसंच ऑनलाईन वर्ग आणि ऑफलाईन परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अजूनच कठीण होईल म्हणूनही ऑनलाईन परीक्षांची मागणी करण्यात येत असावी.
कशा होणार CBSE, ICSE बोर्डाच्या परीक्षा
या आधी CBSE आणि ICSE बोर्डानं दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्याची अंमलबजावणीहे केली आहे. यापुढील बोर्डाच्या परीक्षा या दोन टर्ममध्ये घेतल्या जातील असं CBSE बोर्डानं स्पष्ट केलं आहे. त्यानुसार CBSE Term 1 परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यातही आली आहे. लवकरच CBSE ची टर्म २ परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यामुळे CBSE च्या विद्यार्थ्यांना हे सोयीचं असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांवर ताणही कमी असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची गृहमंत्रालयाकडून होणार चौकशी
दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षां घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तसेच विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तेथील गर्दी नियंत्रणात आणण्याचे देखील आदेश वळसे पाटील यांनी दिले आहेत. (State Home Minister Dilip Walse Patil On Student Protest ) या आंदोलनामागे असणाऱ्या हिंदुस्थानी भाऊचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, विद्यार्थांची डोकी भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Will Hindustani Bhau Be Arrested)