मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत घणाघाती आरोप केले आहेत. वरुण सरदेसाईंसोबतच्या संबंधांमुळे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझे यांची वकिली करत नव्हते ना? असा सवाल विचारत नितेश राणेंनी थेट निशाणा साधला आहे. याशिवाय, मुंबईतील एका शिवसेना नेत्याचं टेलिग्राम चॅट आहेत. तेही तपासून घेण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
‘वाझे प्रकरणात शिवसेनेचे युवा नेते वरून सरदसाई यांची भूमिका आहे. त्यामुळे वरून सरदेसाई यांचे फोन रेकॉर्डिंग तपासले जावे,’ अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. राणे यांनी या पत्रकार परिषदेत अनेक धक्कदायक आरोप केले आहेत. ‘एक साधा एपीआय इतकं मोठं पाऊल उचलतो. त्याची वकिली करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उतरतात. सामनाचे संपादक किंवा शिवसेना नेते त्यांची बाजू घेण्यासाठी पुढे येतात ते का? असा प्रश्न पडतो. त्याची काही कारण माझ्याकडे आहेत,’ असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
सचिन वाझे प्रकरणाचा आयपीएलच्या सट्टेबाजांशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी यावेळी केला. गेल्यावर्षी आयपीएलची मालिका सप्टेंबर ते नोव्हेंबर आयपीएल मालिका खेळली गेली. आयपीएलचे जे सामने खेळवले जातात यावर सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
सचिन वाझे यांनी ही रक्कम मागितल्यानंतर त्यांना आणखी एक फोन जातो. आणि ही रक्कम घेतल्यानंतर यात आम्हाला किती रक्कम मिळणार, अशी मागणी या व्यक्तीकडून केली गेली. वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यातील जे संभाषण आहे ते महत्त्वाचं आहे. या संभाषणाबद्दलची माहिती एनआयएने घ्यावी. कुणाच्या सांगण्यावरुन वरुण सरदेसाई यांनी फोन केले? वरुण सरदेसाई कुणाचे नातेवाईक आहे? वरुण सरदेसाईंवर कुणाचा आशीर्वाद आहे? हे एनआयने तपासावं, असं नितेश राणे यांनी सांगितलं. वरुण सरदेसाई यांची कॉल रेकॉर्ड जोपर्यंत तपासले जात नाहीत तोवर वाझेंच्या मागचा मास्टरमाईंड समोर येणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
सचिन वाझे प्रकरणाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर आरोप केले आहेत. ‘हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. माझ्याकडे जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा असं वाटलं की पोलीसच असे वागत असतील तर काय? सरकारने या प्रकरणात पाठीशी घातलं. मनसुख यांची हत्या ही गंभीर आहे. यात केवळ सचिन वाझे हे नाहीत. ही सुरुवात आहे. यात अजून कोण कोण आहे हे बाहेर आलं पाहिजे,’ अशी आक्रमक मागणी फडणवीस यांनी नुकतीच केली आहे.