मुंबई (वृत्तसंस्था) बेळगावात कानडींकडून मराठी माणसांवर खुनी हल्ले सुरू असून त्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असं सांगतानाच पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
बेळगावात मराठी माणासांवर सुरु असलेल्या दडपशाहीविरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कन्नड वेदिकेकडून बेळगावमध्ये हल्ले सुरू असून या ठिकाणी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवलं पाहिजे. नाही तर कर्नाटकात तणाव वाढेल, असं सांगतनाच मी सुद्धा बेळगावला जाणार आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. सांगली, सोलापूरचे लोक बेळगावात घुसले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. हा भाषा वाद आहे. तो फार वाढू नये. आम्ही राष्ट्रीय एकात्मता मानतो. कर्नाटकनेही राष्ट्रीय एकात्मता मानली पाहिजे. बेळगावात कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू आहे. कन्नड वेदिका संघटनेच्या फडतूस लोकांनी वातावरण बिघडवले आहे. ही भाजप स्पॉन्सर संघटना असून बेळगावातील परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.
बेळगावात खुनी हल्ला सुरू आहे. आमच्या लोकांवर हल्ला होता आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही शांत आहेत. पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हल्ल्याची भाजपला चिंता वाटते. मग कर्नाटकमधील हल्लांबाबत मोदी आणि शहा गप्प का? असा सवालही त्यांनी केला.
डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका
कर्नाटकातील दडपशाही विरोधात आवाज आम्ही उठवू. मात्र त्यांनी कठोर पावलं उचलायला आम्हाला भाग पाडलं तर ती पावलं सरकारी नसतील. ती पावलं राजकीय असतील. मग डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका, असा इशारा कन्नडीगांच्या उन्मादावर संजय राऊत यांनी दिला आहे.
काल दुपारी बेळगावमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हल्ला केला. हा हल्ला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. काही कार्यकर्ते शिवसेनेच्या शाखेकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी एकट्या शिवसैनिकाने कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. यानंतर मराठी भाषिकांनी त्याठिकाणी निदर्शनं करून कर्नाटक प्रशासन आणि कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी केली.