जळगाव (प्रतिनिधी) खासदार रक्षाताई खडसे भाजपवर टीका करणाऱ्यांना प्रतिउत्तर का देत नाहीत?, टीका करणाऱ्यांविरुद्ध एकदाही पक्षाची बाजू माध्यमांमध्ये का मांडत नाही?, त्यांच्या वाहनात भाजपच्या कार्यकर्त्यांऐवजी तुतारीवाले कायम का फिरत असतात?, अशा संतप्त भावना आज रावेरकडील कार्यकर्त्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडे मांडल्या. यावेळी मंगेशदादांनी शांतपणे सर्व ऐकून घेत कार्यकर्त्यांनी समजूत काढली.
आज शहरातील ब्राम्हणवाडी सभागृहात भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा होता. यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, अमोल जावळे, उज्वलाताई बेंडाळे, रोहित निकम यांच्यासह लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या रक्षाताई खडसे, स्मिताताई वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाषणात सर्वच नेत्यांनी आणि तिकीट जाहीर झालेल्या उमेदवारांनी एकदिलाने काम करण्याचा सूर आवळला. परंतू बैठक संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना उफाळून आल्या. रावेर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते सभागृहाबाहेर थांबून नेत्यांची वाट बघत उभे होते. आमदार मंगेशदादा चव्हाण बाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला.
खासदार रक्षाताई खडसे भाजपवर टीका करणाऱ्यांना प्रतिउत्तर का देत नाहीत?, टीका करणाऱ्यांविरुद्ध एकदाही पक्षाची बाजू माध्यमांमध्ये का मांडत नाही?, मॅडमांच्या वाहनात भाजपच्या कार्यकर्त्यांऐवजी तुतारीवाले (राष्ट्रावादी) कायम का बसलेले असतात?, अशा अनेक तक्रारी करायला सुरुवात केली. आम्ही मोदी साहेबांकडे बघूनच मतदान करणार पण आमच्या भावना कुणी समजून घेणार आहे की नाही?, संबंधितांना कुणी ताकीद देणार आहे की नाही?, असे गऱ्हाणे मांडायला सुरुवात केली. कार्यकर्ते संतापात असल्याचे बघून सुरुवातील आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.
थोड्यावेळा नंतर मग आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढायला सुरुवात केली. तुमच्या भावना मी समजून घेतल्या आहेत. तुमच्या भावना किंवा संताप चुकीचा असल्याचे मी म्हणत नाही. पण आपला पक्ष शिस्तीवर चालतो. माझ्यासकट सर्वांना शिस्त पाळावी लागेल. आपले सर्वांचे नेते गिरीशभाऊ महाजन यांच्यापर्यंत तुमच्या भावना पोहचवतो. यातून आपण लवकरच मार्ग काढू, असे तुम्हा सर्वांना आश्वासन देतो, असे सांगत मंगेशदादा चव्हाण यांनी सर्वांना शांत केले. त्यावर कार्यकर्तेही म्हणाले…आम्ही मतदान कमळालाच करणार, पण दादा आम्ही तुमच्याकडे नाही तर कुणाकडे भावना व्यक्त करणार?. आमच्या भावनांना काही किंमत आहे की, नाही?. त्यावर मंगेशदादा यांनी पुन्हा सर्वांची समजूत घातली आणि लवकरच यावर मार्ग काढण्याचे पुन्हा आश्वासन दिले. दरम्यान, रावेर लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत या बैठकीत सर्व आलबेल असल्याचे दाखवण्यात आले असले तरी दुसरीकडे मात्र, अंतर्गत धुसफुस गंभीर असल्याचे दिसून येत आहे.