अहमदनगर (वृत्तसंस्था) श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरनजीक असलेल्या एकलहरे शिवारात एका बॅटरी व्यावसायिकाचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. हा खून दरोडेखोरांनी केल्याची माहिती मयताच्या पत्नीने पोलिसांना दिली होती. परंतू पत्नीने झोपेच्या गोळ्या देवून साडीने गळा आवळत पतीचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुरूवार दि. २१ रोजी मध्यरात्री चार दरोडेखोरांनी पठाण यांच्या घरावर दरोडा टाकून पतीचा खून करत मलाही गंभीर मारहाण केली होती. तसेच बंगल्यातील सात लाख रुपये व दागिने घेवून दरोडेखोर पळून गेले, अशी तक्रार मयत नईम पठाणची पत्नी बुशरा हिने पोलिसात दिली होती. परंतू पत्नी बुशरा हिच्याकडे पोलीसांनी चौकशी करायला सुरुवात केल्यावर ती प्रत्येक वेळी वेगवेगळी हकीकत सांगत होती. बुशरा उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे ती आपली दिशाभूल करत असल्याचा संशय पोलीसांना आला. यानंतर पोलिसांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता तिने खूनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.
पती नईम हा गेल्या पाच ते सात वर्षांपासून अनैसर्गिक संबंधासाठी छळत होता. या रागातून गुरूवारी रात्री दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून ते दूध मी नईमला पिण्यास दिले. त्याला गुंगी आल्यावर ओढणीचे एक टोक खिडकीच्या गजास बांधून गळ्याभोवती आवळून त्याला जीवे मारले. बंगल्यातून कोणत्याही प्रकारे पैसे अगर दागिने चोरी गेले नाही, अशी कबुली बुशरा हिने दिली. त्यावरून पोलीसांनी तत्काळ तिला अटक केली.
जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. दिनेश आहेर, सहाय्यक फौजदारी बाळासाहेब मुळीक, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी आदी अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी पार पाडली.