पाटणा (वृत्तसंस्था) प्रेम विवाह केल्यानंतरही पहिल्या प्रियकराशी पत्नीचे विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affair) सुरुच होते. याची कुणकुण लागल्यानंतर चिडलेल्या नवऱ्याने पत्नीच्या प्रियकराचे हात पाय बांधले, त्यानंतर त्याचा गळा चिरला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. बिहारमधील मुंगेर येथे घटना घडली. या ठिकाणी स्थानिकांनी तरुणाला गंभीर अवस्थेत पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले.
आरोपी साजनच्या पत्नीचे रुपेश नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. याविषयी समजताच साजन चांगलाच भडकला. रागाच्या भरात त्याने रुपेशला जीवे ठार मारण्याचा कट रचला. त्याने भावासोबत कट रचून रुपेशला अमझोर डोंगरावर बोलावले. रुपेश तिथे पोहोचताच दोघांनी त्याचे हात-पाय बांधून गळा चिरला. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर रुपेश कसाबसा डोंगरावरुन खाली उतरला. सुदैवाने त्याला जखमी अवस्थेत पाहून काही जणांनी पोलिसांना कळवले.
गंभीर जखमी झालेला रुपेश काही बोलू शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्याने कागदावर साजन आणि सागर यांची नावे लिहून संपूर्ण घटनाक्रम कथन केला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली. त्याचवेळी दोन्ही भावांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. आपला प्रेमविवाह झाल्याचे आरोपी साजनने पोलिसांना सांगितले. तरीही त्याची पत्नी तिचा एक्स बॉयफ्रेण्ड रुपेशशी बोलायची आणि दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.