बीड (वृत्तसंस्था) राज्य सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात बीड जिल्ह्यातून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना संधी मिळणार का? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांना २०१४ मध्ये भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळाली होती. भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीतही त्या होत्या. राज्यात मुंडे या ओबीसींचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. परंतू मुंडे यांचा २०१९ निवडणुकीत परळीतून पराभव झाल्यापासून त्या भाजपापासून दुरावत जात आहेत. कारण याच काळात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना बीड जिल्ह्यात राजकीय बळ दिले होते. या कारणामुळे फडणवीस व मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. यानंतर मुंडे या कोअर कमिटीतून बाहेर पडल्या होत्या. दरम्यान, पंकजा मुंडे या विधानसभा, विधान परिषदेच्या सध्या सदस्य नाहीत. यामुळे नव्या मंत्रिमंडळात आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या नावाची देखील चर्चा आहे. तसेच गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांना देखील संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.