नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे पुढील अध्यक्ष कोण असतील याबद्दलचे चित्र स्पष्ट नाही. राहुल गांधी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील की या वेळी गांधी परिवाराच्या बाहेरील नेत्याला जबाबदारी मिळते याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
आगामी काळात काँग्रेसच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. समिती सदस्यांच्या म्हणण्यानुसार येत्या २० ते २५ दिवसांत मतदार यादी तयार केली जाईल. सर्व मतदारांना डिजीटल आयडी तयार केला जाईल. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याऱ्यांची संख्या सुमारे १५०० आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवीन अध्यक्षांची निवड निवडणुकांच्या माध्यमातून केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने आपले काम सुरू केले आहे. केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक मंगळवारी एआयसीसी येथे झाली. मतदार यादी तयार झाल्यानंतर समिती ही यादी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवेल. यानंतर सीडब्ल्यूसीची बैठक बोलविली जाईल. त्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा तारखेबाबत निर्णय घेतील. मात्र, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत, असे समितीच्या सदस्याने अगदी स्पष्टपणे सांगितले. समितीच्या म्हणण्यानुसार सीडब्ल्यूसीकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्यांना निवडणुका घेण्यास किमान २६ दिवस लागतील.