जळगाव (प्रतिनिधी) खान्देशात पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जमिनीत ओल आलेली नाही. धरणे अद्याप कोरडी आहेत. दुष्काळ सदृश्य भयावह परिस्थिती झाली आहे. मात्र, राज्य सरकारच्या मंत्र्यांना त्याचे गांभीर्य नाही. त्यामुळे खान्देशात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र देणार असल्याचे माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी सांगितले. श्री. महाजन यांनी आज बऱ्याच दिवसानंतर जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जळगाव जिल्हा भाजपच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गिरीश महाजन बोलतांना पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्ष श्रेयवादाच्या लढाईत राज्याचे नुकसान होत आहे. काही भागात पूरग्रस्थ परिस्थिती तर काही ठिकाणी दुष्काळाचे सावट असल्याने जनता हवालदिल झाली आहे. आता सध्या कधीकधी ढगाळ वातावरण असते. त्यामुळे अशा काळात कृतीम पाऊस पाडणे शक्य आहे. म्हणूनच खान्देशात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र देणार असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाना भाजप सरकारने परवानगी मिळाली होती. ते कामे सुरू देखील झाले होते. मात्र अनेक धरण प्रकल्पांची सुरू असलेली कामे या सरकारने बंद पाडली. ९० टक्के काम झालेल्या वाघूर धरणासाठी सध्याच्या सरकारने रुपयांचा सुध्दा निधी दिला नाही.
आघाडी सरकार नसून बिघाडी सरकार आहे. आतापर्यंत सर्वात अपयशी सरकार असून भूलथापा मारण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. लोकप्रिय म्हणवून घेणारे मुख्यमंत्री स्वता:ची पाठ थोपवून घेत असल्याची टीकाही महाजन यांनी केली. तसेच मुबंई महापालिका निवडणुक भाजपा स्वबळावर व पूर्ण ताकदीनीशी लढणार आहे. मनसेची मिळाली तर मदत घेणार असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, आ.सुरेश भोळे, माजी आ.स्मिता वाघ, जि. प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील, पद्माकर महाजन, नंदू महाजन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.