मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीतही (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शिवसेनेची अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं. आता एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक असलेले १३ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं आहे.
एकनाथ शिंदे हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. शिवसेनेकडून वारंवार ही चर्चा फेटाळून लावण्यात येत असतानाच आता मात्र मोठी घडामोड घडताना पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर काल संध्याकाळपासून शिवसेनेचे १३ आमदार कोणाच्याही संपर्कात नाहीत. निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदार उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची अनुपस्थिती हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.
शिंदेंसोबत गायब असलेल्या शिवसेना आमदारांची यादी
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे इतर दोन मंत्रीही गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. तसंच बालाजी किणीकर, संजय शिरसाट, शांताराम मोरे, महेंद्र दळवी, संजय रायमूलकर, संजय गायकवाड, शहाजीबापू पाटील आणि नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील काही आमदार हे शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये निघून गेले आहेत.
नेमका कुठे आहेमुक्काम?
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नाराज आमदार सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
दुपारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार?
रात्री झालेल्या बैठकीनंतर आज दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा शिवसेनेकडून आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात येत आहे. मात्र हे सर्व आमदार दुपारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.