बोदवड (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसकडून महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई खडसे-खेवलकर यांचे नाव नुकत्याच नाशिक येथे झालेल्या बैठकीत पुढे आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात बारामती प्रमाणे नणंद व भावजय अशी लढत होते की काय?, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
याआधी जेष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांचे नाव चर्चेत होते आणि आमदार खडसे जर लोकसभेला उभे राहिले तर हा मतदारसंघ भाजप गमावून बसेल अशा चर्चा सुरू झाल्या. त्यासाठी खडसे यांना शह देण्यासाठी भाजपने पुन्हा रक्षाताई यांना उमेदवारी जाहीर केली. त्या आधी भाजपतर्फे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. लोकसभेसाठी एक एक जागा महत्त्वाची मानत असलेल्या भाजपने जर एकनाथराव खडसे उभे राहिले तर ही निवडणूक अमोल जावळे यांना जड जाऊ शकते, अशी शक्यत वाटल्याने की काय त्यांनी रक्षाताई यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. रक्षाताई यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच आमदार खडसे यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे संकेत दिले होते. त्याचवेळी रक्षा खडसे यांची दावेदारी बळकट झाली. कारण रक्षाताई यांच्या प्रत्येक विजयात एकनाथराव खडसे यांची भूमिका महत्त्वाची होती. मात्र यावेळेस चित्र वेगळे आहे. खडसे हे राष्ट्रवादीत शरद पवार पक्षात आहेत. शिवाय त्यांचे राजकीय पुनर्वसन शरद पवार यांनी आमदारकी देऊन केले आहे. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीसाठी कसून प्रयत्न करावे लागणार. एकूण राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपास टक्कर देण्याच्या मानसिकेत असल्याने मजबूत उमेदवार मिळाल्यास त्यांचाही उत्साह वाढेल.
महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांना उमेदवारी मिळाल्यास आमदार एकनाथराव खडसे यांचे वलय याचा निश्चित फायदा होऊ शकेल. या विचाराने नाशिक येथे झालेल्या बैठकीत पुढे आल्याचे समजते. जर बारामती मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार तशी लढत होऊ शकते तर रावेर लोकसभा मतदारसंघातसुद्धा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होण्यास काय हरकत आहे?, अशी मानसिकता कार्यकर्त्यांची असल्याने कदाचित रोहिणीताई खडसे यांचे नाव पुढे आले असावे. सोबतच सध्या आमदार एकनाथराव खडसे यांचे राष्ट्रवादी शरद पवार गटात असणे गेल्या काही वर्षात रोहिणीताई खडसे यांचा वाढलेला जनसंपर्क, पक्षाचे प्रचारासाठी व राज्यातील सरकारच्या धोरणाविरुद्ध जनजागृती साठी केलेली जनसंवाद यात्रा, याचाही त्यांना निश्चित फायदा मिळू शकेल, असेही काही कार्यकर्त्यांचे मत आहे. सोबतच मित्र पक्षांची सुद्धा मजबूत साथ राहीलच हे ही गणित कार्यकर्त्यांच्या पुढे असावे.
या निवडणूकी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी याआधीच लोकसभेसाठी उभे राहण्यास नकार दिलेला असल्याने अपेक्षित नाव आमदार खडसे यांचेच होते. मात्र, त्यांनी सुद्धा निवडणूक लढण्यास अनुकूलता न दाखवल्याने ही निवडणूक रोहिणीताई यांनी लढवावी व आमदार खडसे यांच्या राजकीय वर्चस्वाचा व अनुभवाचा फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एक जागा मिळवून द्यावी, अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. या प्रस्तावास आमदार खडसे मान्यता देतात की, पक्षाने आदेश दिल्यास स्वतःच लोकसभा लढवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अगदी तसे न झाल्यास रोहिणीताई खडसे यांची उमेदवारी घोषित झाली तर रावेर लोकसभा मतदारसंघात सुद्धा बारामती मतदारसंघाप्रमाणे ननंद व भावजय अशी लढत पाहावयास मिळेल का ? हे लवकरच समजेल.