जळगाव ( प्रतिनिधी ) – लाडकी बहीण योजनेचे केवायसी करून देण्यासाठी कागदपत्रे घेण्यासाठी आलेल्या संशयिताने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्यासह अन्य एका महिलेकडेही प्रेमसंबंधाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीचा मित्र गोकूळ चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील ३५ वर्षीय महिलेला लाडकी बहीण योजनेचे केवायसी करायचे असल्याने तिच्या पतीचा मित्र गोकूळ चव्हाण हा दि. २५ जानेवारी रोजी सदर महिलेच्या घरी आला होता. त्याने संबंधित महिलेकडून कागदपत्रे घेतले. त्यानंतर त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. हा प्रकार महिलेने पतीला सांगितल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. तरीदेखील तो वारंवार महिलेच्या घरासमोर येऊन उभा राहत महिलेकडे पहायचा. दि. ८ एप्रिल रोजीदेखील त्याने असाच प्रकार केल्याने महिलेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गोकूळ चव्हाणयाच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश वाघ करीत आहेत.
दुसऱ्या महिलेकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी
दुसऱ्या प्रकारामध्ये याच परिसरातील अन्य एका महिलेला ‘बंद झालेले विधवा निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो’, असे म्हणत गोकूळ चव्हाण याने महिलेकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.
















