धुळे (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आवारात धुळे सूरत बस फलाटावर पुणे येथे राहणाऱ्या एका महिलेचे १ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचे दागिने व रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील आळंदी रोड परिसरात राहणाऱ्या हर्षला सुनील चौधरी (३४) ही महिला दि. २८ रोजी ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात सूरतकडे जाणाऱ्या बस फलाटावर बस स्थानकावर वाहनाच्या प्रतिक्षेत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांची पिशवी चोरुन नेली.
या पिशवीत १६ हजार रुपये किमतीची ४ तोळे वजनाची सोन्याचे गठण, २४ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले. ४ हजार रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाची अंगठी, २ हजार ५०० रुपये रोख व इतर दागिने असा एकूण १ लाख ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी हर्षला चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द भादवी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.