जळगाव ( प्रतिनिधी )दि. 8 – “स्त्री आरोग्यसंपन्न असेल, तर संपूर्ण कुटुंब आणि समाज निरोगी राहील. त्यामुळे महिलांसाठी आरोग्य व कायदेशीर मार्गदर्शन शिबिरे आवश्यक आहेत. महिला दिन हा केवळ औपचारिकता नसून त्यांच्या संघर्षाचा आणि यशाचा गौरव करण्याचा दिवस आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
गेल्या काही वर्षांत स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन आणि इतर योजनांमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. “नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. महिला सबलीकरणासाठी शासन पुढील टप्प्यात अधिक योजना राबवणार असून, महिलांनी शिक्षण, उद्योग, विज्ञान, क्रीडा आणि समाजसेवेच्या प्रत्येक क्षेत्रात मोठी झेप घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
महिलांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री कन्यादान योजना, सुकन्या समृद्धी योजना, लाडकी बहीण योजना आणि महिला बचतगट अनुदान योजना यांसारख्या उपक्रमांद्वारे शासन ठोस पावले उचलत आहे. महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी पुढील काळात नवीन संधी निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, उपआयुक्त धनश्री शिंदे, शहर अभियंता मनीष अमृतकर, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, सुमित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. राजूमामा भोळे यांनी महिलांचे प्रत्येक क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “स्त्री ही सर्वोच्च शक्ती आहे. ती शिस्त आणि संयमाचे प्रतीक आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी मनपा, राज्य आणि केंद्र शासन खंबीरपणे पाठीशी आहे,” असे ते म्हणाले.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांनी महिला व बालकल्याण विभागांतर्गत 2024-25 या वर्षासाठी राखीव निधीच्या वापराबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांनी केले, तर आभार उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांनी मानले.
महिला सबलीकरणासाठी विविध योजना सुरू
महिला सशक्तीकरणाच्या अनुषंगाने शिष्यवृत्ती वाटप आणि क्रीडा प्राविण्य विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्याच्या योजनांचे उद्घाटन करण्यात आले. दहावी व बारावीमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या मुलींना शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. महिला खेळाडूंना विशेष आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
यावेळी महिला व बालकल्याण निधीतून 2024-25 मध्ये राबविण्यात येणाऱ्या 23 योजनांचे सादरीकरण झाले. त्यामध्ये शहरातील 1300 बालकांना पोषण आहार, दप्तर, वॉटर बॅग व खेळणी वाटप, शालेय विद्यार्थ्यांना दप्तर, टिफिन बॉक्स, वॉटर बॅग वाटप, महापालिकेच्या शाळांमध्ये खेळासाठी लेझीम, चेस, कॅरम व इतर साहित्य उपलब्ध करणे, शुद्ध पाण्यासाठी आरो मशीन आणि वॉटर कुलर बसविणे,महिला बचतगटांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम,दहावी व बारावीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती वाटप,महिला खेळाडूंना आर्थिक मदत,महानगरपालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे व सुरक्षा उपाययोजना,महिला आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन.
पालकमंत्र्यांकडून चार नवीन योजनांची घोषणा
महिला सशक्तीकरणाच्या उद्देशाने पुढील चार नवीन योजना राबविण्यात येणार आहेत:
▪️पिंक ई-रिक्षा’साठी अर्थसहाय्य
▪️महापालिकेच्या गाळ्यांपैकी 5% गाळे महिलांसाठी राखीव
▪️महिला बचतगटांच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्ती अभियान व कापडी पिशवी निर्मिती
▪️महानगरपालिका हद्दीतील हायस्कूल व कॉलेजमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविणे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या योजनांच्या त्वरित अंमलबजावणीसाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांना निर्देश दिले.