धरणगाव प्रतिनिधी – जागतिक एड्स दिन पंधरवडा निमित्ताने क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) व ग्रामीण रुग्णालय धरणगाव यांच्या आयसीटीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज एचआयव्ही/एड्स जनजागृती, माहिती मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाने झाली. त्यांनी एचआयव्ही/एड्सचे नियंत्रण व प्रतिबंध, संसर्ग होण्याची कारणे, निदान प्रक्रिया, उपचार पद्धती, प्रतिबंधात्मक उपाय, आरटी औषधोपचार, तसेच एचआयव्ही-एड्स कायदा २०१७, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. युवकांनी एड्सविषयी जागरूक राहून समाजप्रबोधनात पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. यानंतर राजेश्वर काकडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आयसीटीसी विभाग यांनी एचआयव्ही तपासणी पद्धती, चाचणीचे महत्व आणि संक्रमणाविषयी योग्य वैज्ञानिक माहिती विद्यार्थ्यांना दिली. किशोरवयीन आरोग्य कार्यक्रमांतर्गत गणेश कुंभार सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, उद्भवणाऱ्या समस्या तसेच योग्य आरोग्यविषयक सवयी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मा. प्राचार्य एम. ए. मराठे यांच्यासह एस. एम. खरे, एस.सी. भरते, नंदा कापडी, एस.आय. शेख, ऋतू राठोड, माधुरी शिंदे, कजबे, नांद्रे, भोगे सर व लोकेश चावरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमानंतर संस्थेत रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. नव्याने निवडलेल्या सदस्यांना क्लबची कार्ये, उद्दिष्टे आणि समाजातील एड्स जनजागृती मोहिमेत त्यांनी निभवायची जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी वैज्ञानिक जागरूकता निर्माण झाली असून आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन रुजविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप वाघ यांनी तर आभार भूषण राणवे यांनी मानले.












