नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना रुग्णसंख्या दररोज एक नवा रेकॉर्ड कायम करताना दिसतेय. देशात रविवारी २४ तासांत जवळपास १,६९,९१२ कोरोना रुग्ण आढलले आहेत. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. हाच वेग कायम राहिला तर देशात दररोजची संख्या अगदी काही दिवसांत दोन लाखांवर पोहचू शकते. तर, देशात रविवारी ९०४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ६९ हजार ९१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ९०४ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. तर ५ एप्रिलच्या सकाळपर्यंत २४ तासात देशात ४७७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात हा आकडा ८३८ वर पोहोचला. तर देशात दररोज जितके रुग्ण आढळत आहेत, त्यातील १.२७ टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे.
तसेच देशात पाच एप्रिलच्या सकाळपर्यंत ७,३७,८७२ अॅक्टिव्ह रुग्ण होते. ११ एप्रिलला रात्रीपर्यंत हा आकडा ११,८९,८५६ वर पोहोचला आहे. म्हणजेच मागील एका आठवड्यात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत तब्बल पन्नास टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रविवारी सकाळपर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची दर ८.२९ टक्के राहिला. हा दर सात दिवसांपूर्वी ५.८६ इतका होता.
दररोज नोंद होणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आणि अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत देश सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.