नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ३४ हजार ६९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत १३४१ रुग्णांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे १ लाख २३ हजार ३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे ही देशवासीयांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ इतका झाला आहे. यापैकी आजपर्यंत १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण कोरोनावर मात करून बरे देखील झाले आहेत. मात्र, अजूनही देशात १६ लाख ७९ हजार ७४० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत. त्यासोबतच देशात आजपर्यंत कोरोनामुळे तब्बल १ लाख ७५ हजार ६४९ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारला गांभीर्याने पावलं उचलण्याची अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातही वेगाने रुग्णसंख्येत वाढ
महाराष्ट्राचा विचार करता, शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ कोरोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, शुक्रवारी ४५ हजार ३३५ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात एकूण ३०,०४,३९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.१२ टक्के एवढे झाले आहे.