नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशात दररोज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रम नोंद होत असून मृत्यूदरातही वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० नव्या कोरोना बाधितांचा आकडा समोर आला आहे. तसेच कोरोनामुळे १ हजार ५०१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात दिलासा देणारी बाब म्हणजे, देशात गेल्या २४ तासांत १,३८,४२३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी २३४,६९२ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली होती. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत १५ सप्टेंबर रोजी सर्वाधिक १ हजार २९० रुग्णांचा मृत्यू झाला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४२३ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशासाठी चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येत २४ तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात १ हजार ५०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचली आहे.