नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच हैदोस घातला आहे. हि परिस्थिती मागच्या दोन महिन्यापासून देशात पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासमोरच्या प्रत्येक नागरिकासमोर एक धडकी भरवणारी माहिती आणली आहे. ती धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा प्रचंड वेगाने वाढला असून, फक्त एप्रिल महिन्याच्या ३० दिवसांत देशात ४५,००० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
नवं वर्ष सुरू झाल्यानंतर कोरोनाची भीती दूर होऊ लागली होती. मागचं संपूर्ण वर्ष लॉकडाउनमध्ये गेल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर यायला लागलं होतं. भारताने कोरोनावर विजय मिळवल्याचे दावेही सरकारांकडून केले जात होते. अशातच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं. बघता बघता मार्चमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर एप्रिलमध्ये एका दिवसातील विश्वविक्रम कोरोना रुग्णसंख्येची नोंद भारतात झाली.
१ एप्रिल रोजी देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या होती १,२३,०२,११५ आणि एकूण मृत्यू संख्या होती १,६३,४२८. तर देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ६,१०,९२९ इतकी. ही सख्या ३० एप्रिल रोजी प्रचंड बदलून गेली. ३० एप्रिल रोजी देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली १,८७,५४,९८४ आणि मृतांचा आकडा पोहोचला २,०८,३१३ वर. तर ३० एप्रिल रोजी देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ३१,६४,८२५ इतकी.
एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपले हात पाय चांगलेच पसरले. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानसह देशातील विविध राज्यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे पाहायला मिळू लागले. आधी रुग्णालयांबाहेर रांगा दिसत होत्या, नंतर स्मशानभूमी कब्रस्थानं यांच्याबाहेर मृतदेहांच्या रांगा लागल्याच्या दृश्यांनी देशातील परिस्थिती कोलमडत असल्याचं दिसून आलं. एप्रिलमध्ये कोरोनानं मृत्यूचं तांडवच घातलं. अवघ्या तीस दिवसांत देशात ४५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला.